स्नेहमिलन ( शेठ के.डी हायस्कूल. तळोदा. इयत्ता दहावी 1982 बॅच)
स्नेह मिलन करायचं आहे करायचं . आहे असं म्हणता म्हणता ती तारीख येऊन ठेपली. 29 ऑक्टोबर 2022 हा स्नेह मिलनाचा दिवस उजाडला
तळोद्याच्या दिशेने एक एक मित्र-मैत्रिणी येत असल्याच कळू लागले. कधी सर्व भेटतील केव्हा सगळ्यांना पाहू असे अधीर मन सर्वांचे झाले होत.
29 ऑक्टोबर तळोद्यातील वृंदावन वाडी सर्व मित्र-मैत्रिणींनी भरली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अत्यानंद होता. सर्वांची चेहरे प्रफुलित होते. का नसणार? जवळजवळ 40 वर्षानंतर ह्या स्नेह मिलनात सर्वांशी भेट होत होती.
तू कसा आहेस? तू कशी आहेस अशी ?आपुलकीने विचारपूस करत होती. सर्वच एकमेकांना बघून आश्चर्यचकित होत होते कारण दहावीनंतर जवळपास बऱ्याच मित्र-मैत्रिणींचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता आणि इतक्या वर्षानंतर दहावीतली ती शिडशिडीत मुलं-मुली ओळख पटणार नाही इतकी बदलली होती सुस्थिर , सुखी आणि आजी आजोबा झाल्याचा आनंद एकमेकांना सांगत होती. जुन्या आठवणींनी हास्याचे कारंजे उडत होते. तळोद्यातील वृंदावन वाडीतील हा सोहळा म्हणजे निर्भेळ आनंदाची पर्वणीच जणू.
तळोद्यात राहणारी व कामानिमित्त तळोद्याच्या बाहेर राहणारे मित्र यांनी तन , मन ,धनाने पूर्ण सहकार्य केले आणि आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींना ह्या स्नेह मेळाव्याचा आनंद मिळाला याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते.

मुलं, त्यांचं शिक्षण, नोकरी ,लग्न, नातवंड आणि जीवनातील काही चढ उतार या जीवन चक्रातून थोडं बाहेर पडू आणि दहावी 1982 ची बॅच स्नेह मेळावा भरवू असा विचार तळोद्यातील मित्रांच्या मनात आला आणि व्यवस्थित नियोजन ,आराखडा व सतत व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वांशी संपर्क साधून 29 व 30 ऑक्टोबरला स्नेह मिलन झाले. 29 तारखेला वृंदावन वाडीत छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिक्षकांना व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आले .शिक्षकांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शर्ट व पॅन्ट पीस चे कापड आणि चांदीचे शिक्के त्यांना भेट म्हणून देण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए व्ही वाणी सर होते. दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मित्तल टवाळे यांनी केले. तर प्रास्ताविक भाषण राजेंद्र वाणी यांनी केले. विद्यार्थ्यांचे मनोगत यात सर्वांनी शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, संस्कार, त्याच्या जीवनात झालेला उपयोग व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जयेश वाणी , राकेश वाणी, निलेश साळी, धीरज चौधरी ,लक्ष्मण चौधरी , निलेश शहा संजय झेंडे,संध्या बागुल, मंजुषा लाड व यांनी मनोगत व्यक्त केले . शिक्षकांचे भाषण झाले . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या त्यांची प्रगती व शिक्षकांविषयी चा आदर, कृतज्ञता पाहून मन भरून आले .हा सर्व कार्यक्रम साधारण अडीच वाजता संपला त्यानंतर दुपारचे जेवण झाले चार वाजता शेठ. के. डी. हायस्कूलला भेट दिली , तेथे वृक्षारोपण कार्यक्रम, चहापान ,शाळेला कपाट भेट देण्यात आले , सर्वांचा वैयक्तिक परिचय करण्यात आला, सामूहिक फोटो काढण्यात आले ज्या वर्गात शिकत होतो त्या वर्गात जाऊन बसलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.रात्री वृंदावन वाडीत जेवण आणि शाळेतल्या. गमती जमती सांगण्यात आल्या रात्री दहा वाजता सर्वजण आपापल्या घरी गेले.

30 तारखेला श्रीकृष्ण खांडेसरी येथील रोहित कापडिया यांच्या मळ्यात सर्व एकत्र आले खेळ, गाण्याच्या भेंड्या ,नकला ,गरबा खेळण्यात आला दुपारचे जेवण झाले साधारण चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला संध्याकाळी सहाला परत सगळे एकत्र आले आपल्या जीवनातले काही प्रसंग जुन्या आठवणी काहींनी सांगितल्या . रोहित कापडिया यांनी समारोप आणि आभार प्रदर्शन केले .आणि रात्रीचे जेवण झाल्यावर दहाला सर्वांनी या स्नेह मिलनाचा निरोप घेतला .या कार्यक्रमात एकूण 94 सभासद होते .सर्वांच्या सहकार्याने हे स्नेह मिलन यशस्वी झाले. हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनात हे दोन दिवस सकारात्मक ऊर्जा आणि पुढील वाटचालीत मैत्रीची हाक आणि साद याची साक्ष असेल याची जाणीव झाली .
गीतकार सुधीर मोघे यांचं एक गीत आठवलं.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर
कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावूनिया प्रीतीचा झरा
जरा विसावू या वळणावर
या वळणावर ,या वळणावर.

लेखिका …मंजुषा शिरीष लाड.
गोवा…मडगाव.




