नेटका, अनुकरणीय आणि ‘ अतुलनीय ‘ कार्यक्रम !
गोपाळ कुळकर्णी
जेष्ठ पत्रकार, लातूर
लातूर ..-‘वारसा संस्कृतीचा -जाणीव कृतज्ञतेची’ हे ब्रीदवाक्य घेऊन गत २२वर्षापासून अभियांत्रिकी क्षेत्रातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या येथील जानाई प्रतिष्ठानने रविवारी एका नेटका , अनुकरणीय व अतुलनीय कार्यक्रमाचे आयोजन करून लातूरकरांची प्रशंसा मिळवली .
लातूर येथील सुप्रसिद्ध वास्तुविशारद आणि सामाजिक कार्यकर्ते , शीघ्रकवी अतुल ठोंबरे यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण खूपच कष्टपूर्वक पूर्ण करून बांधकाम क्षेत्रात अल्पावधीतच जम बसवला आहे.अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणे हे तसे सोपे काम नाही जाणीव असल्यामुळे त्यांनी अभियांत्रिकी शाखेत नावलौकिक मिळवणार्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जानाई प्रतिष्ठानची स्थापना केली . सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून यातून खर्च वजा जाता राहिलेल्या पैशातून त्यांनी अभियंते घडवण्याचे काम केले .आतापर्यंत दानशूर लोकांच्या दातृत्वातून त्यांनी १३०अभियंत्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. अतुल ठोंबरे यांचे हे कार्य ‘अतुलनीय ‘ आहे .त्यांच्या या कार्याला सलाम !
वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक जाण ठेवून रुग्णसेवा करणार्या देवदूतांना ‘ डॉक्टर डे ‘ चे औचित्य साधून दरवर्षी एका डॉक्टरांना ‘ डॉक्टर जानाईश्री ‘ या पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय अतुल ठोंबरे यांनी घेऊन सर्वांना अचंबित केले . अभियांत्रिकी क्षेत्रासाठी कार्यरत असणाऱ्या या प्रतिष्ठानने वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरस्काराचे आयोजन कशासाठी ? अशी त्यांच्यावर टीकाही झाली ; परंतु ज्या क्षेत्रात काम करायचे किंवा जी जबाबदारी पेलायची ते काम ‘ अतुलनीय ‘ करण्याचा खाक्या असलेल्या या अवलियाने टीकेला नेटके काम करून उत्तर देण्यातच धन्यता मानली.
प्रसिद्ध बाल रोग तज्ञ व किल्लारी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर सचिन बालकुंदे यांना ‘डॉक्टर जानाई श्री ‘ पुरस्कार वितरणासाठी प्रतिष्ठानने त्यांची निवड केली .आणि हा पुरस्कार देण्यासाठी प्रतिष्ठानने जानाई ज्फंक्शन हॉल मध्ये रविवारी एका नेटक्या , अनुकरणीय आणि अतुलनीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते .कार्यक्रम नेटका कसा करावा याचा वस्तुपाठ अतुल ठोंबरे यांच्याकडून सामाजिक क्षेत्रात काम करणार्यानी घ्यायला हवा .शिस्तबद्ध कार्यक्रम घेताना त्याची रचना, आखणी आणि बांधणी करण्यासाठी अतुलजी डोळ्यात तेल घालून काम करतात .यासाठी बैठकावर बैठका आयोजित करून ते यात सतत व्यस्त असतात.
दीप प्रज्वलानापासून ते आभार प्रदर्शनापर्यंत कार्यक्रम कंटाळवाणा होऊ नये , नेटका व्हावा यासाठी ठोंबरे यांनी तशी रचना केली होती. मान्यवरांचे स्वागत रोपटे देऊन करण्यापासून व्यासपीठावर कोणाकोणाला पाचारण करायचे याची तयारी चांगली करण्यात आली होती .यामुळे कार्यक्रम लांबला असला तरी कंटाळवाणा झाला नाही. उलट तो उत्तरोत्तर रंगत गेला. उपस्थित मान्यवरांची भाषणे आटोपशीर व उद्बोधक झाली .डॉक्टर बालकुंदे यांना पंचवीस हजार रुपये, शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराची ही रक्कम तेवढ्याच विनयशीलतेने बालकुंदे यांनी प्रतिष्ठानला परत करीत ही रक्कम स्पर्धा परीक्षेत नावलौकिक मिळणाऱ्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अशोक आरदवाड यांनी प्रतिष्ठानला आर्थिक मदत जाहीर केली. कोवीडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य अधिकारी म्हणून किल्लारी सारख्या ग्रामीण भागात निस्वार्थ रुग्ण सेवेतून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणार्या डॉ.सचिन बालकुंदे यांची या पुरस्कारासाठी उचित निवड केली गेली असेच म्हणावे लागेल . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जानाई सांस्कृतिक मंडळाच्याअध्यक्ष डॉक्टर वैशाली टेकाळे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप डॉक्टर अशोक आरदवाड यांनी केला .व्यासपीठावर डॉ. अशोक आरदवाड , सौ.विजया आरदवाड , डॉ. सचिन बालकुंदे , सो. रुपा बालकुंदे, श्रीकांत हिरेमठ ,प्रा. दत्तात्रय मुंडे , समर्थ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गौरी ठोंबरे यांनी केले .











