खाकीतील माणुसकी! लातूरमध्ये पोलिसांनी शोधून दिले १० लाखांचे दागिने; पोलीस उपमहानिरीक्षकांकडून कौतुक
लातूर (प्रतिनिधी): शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अण्णासाहेब खोडेवाड यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. रस्त्यावर सापडलेली १० लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची बॅग मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) शहाजी उमाप यांनी विशेष प्रशंसा पत्र देऊन खोडेवाड यांचे कौतुक केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास लातूर शहरातील सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील रस्त्यावर पोलिसांना एक बेवारस बॅग सापडली होती. या बॅगेत सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. बॅगेच्या मालकाबाबत कोणतीही प्राथमिक माहिती उपलब्ध नव्हती.बॅगेत मौल्यवान ऐवज असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी तातडीने तपास चक्रे फिरवली.
अत्यंत कौशल्याने आणि प्रामाणिकपणे शोध घेत, ती बॅग प्रकाश नगर भागातील रहिवासी श्रीमती ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण किमती ऐवज सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केला.
पोलीस उपमहानिरीक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप:

या घटनेची दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अण्णासाहेब खोडेवाड यांना अधिकृत अभिनंदन पत्र पाठवले आहे.”या घटनेतून आपल्या माता-पित्यांच्या संस्कारांचे व आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. आपल्या या कृतीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास द्विगुणित होण्यास मोलाची मदत झाली आहे. आपल्या या कौतुकास्पद कामगिरीची व प्रामाणिक भूमिकेची मी प्रशंसा करतो,” अशा शब्दांत पोलीस उपमहानिरीक्षकांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि प्रामाणिकतेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





