26.7 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*नयनरम्य ;भक्तीमय श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा*

*नयनरम्य ;भक्तीमय श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा*

पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात अवघे गोकुळ अवतरले

श्रीकृष्ण जन्मोत्सव कथेच्या वेळी सगळेजण नृत्य ,भक्तीरसात दंग झाले◆

विद्यानंदजी महाराजांसह साधूही देहभान विसरून नृत्यात सहभागी झाले●

लातूर ; दि.२८ ( प्रतिनिधी ) –गुलालाची उधळण … राधे राधे … .जय श्री कृष्णाचा जय घोष ….संगीताच्या तालावर नृत्याचा फेर धरीत टिपरी – रासलीला, फुगडी आदी नृत्य करीत उपस्थित हजारो स्त्री – पुरुष भाविक भक्तांनी भक्ती रसात स्वतःचे देहभान हरपत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला या भक्तीरसात कथाकार प पू. विद्यानंदजी सागर महाराज आणि उपस्थित साधुसंतही सहभागी झाले होते.’ याची देही याची डोळा ‘ असा हा नयनरम्य सोहळा संपूच नये असेच प्रत्येकांना वाटत होते.

 निमित्त होते…. श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे..!  श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात विशाल कथा मंडपात विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांच्या श्रीमद् भागवत कथाज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून कथेच्या चौथ्या दिवशी बाबांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा सांगितली. यावेळी हजारो स्त्री- पुरुष , भाविक आपल्या पारंपारिक वेशात नटून-थटून आले होते. माता भगिनींनी रंगीबेरंगी साड्या परिधान केल्या होत्या. पुरुष भावी भक्तांनी फेटे बांधले होते. आपल्याच घरच्या लग्न कार्यात जसे वर्हाडी  नटून थटून येतात तसेच प्रत्येक जण कथा मंडपात आले होते . सर्वजण एकाग्र  चित्ताने बाबाची कथा ऐकण्यात दंग झाले होते .
 परमपूजनीय बाबांनी अगोदरच संयोजन समिती व श्रोते यांना सूचना देऊन शिस्तबद्ध पद्धतीने कशा पद्धतीने हा जन्मोत्सव साजरा करायचा याच्या सूचना दिल्या होत्या . सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि बाबांनी ध्वनिक्षेपकावरून  वसुदेव महाराजांनी मंडपात प्रवेश करावा …. असे आवाहन करतात सर्वजण आपला श्वास रोखून या नयनरम्य दृश्याकडे पाहत होते . बाबांच्या कथेला साथ-संगत करणारे गायक व वादक  " राधे कृष्ण राधे राधे " , "हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की "  आदी भजन सादर करीत होते . माता भगिनी टिपरी नृत्य , फुगडी खेळत दंग झाल्या होत्या आणि आपल्या डोकीवर भगवान बालकृष्णाला घेऊन वसुदेव महाराज व्यासपीठाच्या दिशेने कूच करीत होते… तेव्हा उपस्थित भावीक त्यांच्यावर पुष्पांची व्रष्टी करीत होते.
 या श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यास जिवंतपणा यावा म्हणून काही महिन्यापूर्वी जन्म घेतलेले बालक वसुदेवाच्या डोकीवरील टोकरीत  विराजमान झाले होते .माजी नगरसेवक विशाल जाधव यांचे द्वितीय चिरंजीव बाल श्रीकृष्ण बनवून या टोकरीत विराजमान झाले होते .व्यासपीठावर एक फुलांनी सजवलेला पाळणा ठेवण्यात आला होता. वसुदेव बनून आलेल्या एका पित्याने बालकृष्णास बाबांच्या पुढ्यात दिले. यावेळी बाबांनी या बालकास कुंमकुम तिलक लावून त्याच्या पायावर मस्तक ठेवत भक्ती भावानी वंदन केले.  यावेळी कथा मंडपात श्रीकृष्णाचा जयघोष करण्यात आला. यावेळी या बालकृष्णाचे प्रखर हे नामकरणही प.पू बाबांनी केले . यानंतर भावीक  भक्तांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.

बाबांचे देहभान विसरून नृत्य
या जन्म सोहळ्यात परमपूजनीय विद्यानंद सागर महाराज देहभान विसरून नाचले….! व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या खाली श्रोत्यांमध्ये येऊन सुमारे अर्धा तास बाबांनी श्रीकृष्णाचे भजन, गीत गात नृत्याचा फेर धरला. यावेळी त्यांनी या मागची भूमिकाही विशद केली . ते म्हणाले ,” वास्तविक पाहता आम्ही संन्याशी माणसं .. आम्हाला काही मर्यादा असतात.. पण ज्यावेळी श्रीकृष्ण जन्मोत्सव किंवा राम जन्मोत्सवाची कथा सांगितली जाते त्यावेळी मी सगळे विसरून भक्ती रसात दंग होऊन जातो “.


या जन्मोत्सव सोहळ्यात फुगडी , टिपरी दांडिया रासलीला आदीचे नयनरम्य द्रश् पहायला मिळाले .
दररोजच्या पेक्षा अर्धा तास कथेची वेळ वाढवण्यात आली होती.
प्रारंभी प्रशांत पाटील, श्याम मंत्री , अमोल शास्त्री , प्रेरणा होनराव आदींनी भागवत कथा ग्रंथाचे व बाबांचे पूजन केले. गातेगावचे नाथसिंह देशमुख मालक यांनी प्रास्तावित केले .विशाल जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले . यजमानाच्या आरतीनंतर प्रसाद वाटपानंतर हा जन्मोत्सव सोहळा संपला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]