लातूरकरांनी संयम बाळगावा – महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे आवाहन
पालकमंत्री यांचेही बारकाईने लक्ष
लातूर/प्रतिनिधी:
शहरात नळाद्वारे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचा पिवळसर रंग नाहीसा करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया गतीने सुरू असून लवकरच शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू होईल.लातूरकरांनी संयम बाळगावा,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

गेल्या कांही दिवसात नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नळाला येणाऱ्या पाण्याचा रंग पिवळा का होतो ?याची पालिकेने तपासणी केली आहे.पाण्याचा पिवळा रंग नाहीसा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व दुरुस्तीची कामे केली आहेत.येणारे पाणी राज्यातील विविध ठिकाणच्या प्रयोगशाळांना पाठवून त्याची शुद्धता तपासून घेण्यात आली आहे. नवीनतम तंद्रज्ञान वापरून पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्लोरीन डायॉक्साईडचा साठा सातारा येथून मागविण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकणार आहे,असे ते म्हणाले. उन्हाळ्याच्या दिवसात धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी कमी झाली तरी पाणीपुरवठा करता यावा यासाठी पाणी उपसा करणारा पंप खोलीवर बसवण्यात आलेला आहे. आता वरील गेट उघडून तो पंप उंचीवर बसवला जाणार आहे. यासह इतरही आणखी उपाययोजना मनपाकडून केल्या जात आहेत. लातूरकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जात आहेत.लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल.लातूरकर जनतेने संयम बाळगावा,असे आवाहनही महापौर गोजमगुंडे यांनी केले आहे. चौकट १ ….पालकमंत्र्यांचे विशेष लक्ष…. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे शहरातील पाणीपुरवठ्याकडे आणि पाणी पिवळे येण्याच्या समस्येकडे विशेष लक्ष आहे. पाण्याची शुद्धता तपासणे आणि ही समस्या दूर करण्यासाठी नीर केंद्राला त्यांनी निर्देश दिलेले आहेत. याचे एक पथक लवकरच शहरात दाखल होऊन पाणी तपासणी व आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली.

चौकट २ …शिर्डी, बारामती व औरंगाबादेतही समस्या … लातूर शहरात नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर दिसत आहेत.अशीच समस्या शिर्डी,बारामती तसेच औरंगाबाद सारख्या आणखी काही शहरात उद्भवलेली आहे. उन्हाळ्यात प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर अशी समस्या उद्भवते.या समस्येवर मनपा लवकरच तोडगा काढेल, असे आश्वासनही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिले.