26.3 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeजनसंपर्कफोटोग्राफर माजेद खान यांचे निधन

फोटोग्राफर माजेद खान यांचे निधन


माजेद खान गेला. एक उत्कृष्ट न्यूज फोटोग्राफर, एक उत्तम, मनमिळावू, लाघवी मित्र, निर्मळ मनाचा माणूस. ३० वर्षांच्या पत्रकारितेत सातत्याने त्याचा संबंध होता. मैत्री होती. न्यूज फोटोग्राफी करताना कलात्मक फोटोग्राफीची आवड तो जोपासत राहिला. त्याला असाईनमेंट दिली की उत्तम फोटो येणारच हे पक्कं असायचं. ‘सामना’मध्ये असताना योगेश लोंढे मोठ्या सुट्टीवर असताना माजेद १५ दिवस त्याच्या ऐवजी असाईनमेंट करे. विलासराव मुख्यमंत्री असताना वाल्मी मध्ये दुष्काळाबद्दल बैठक लावली होती. त्याच्या आधी द्यायच्या दणदणीत बातमीसाठी तसाच दणदणीत फोटो हवा होता. आपल्या खळखळ वाजणाऱ्या कायनेटिक होंडा वरून तो पार खुलताबादजवळच्या कागजीपुऱ्याच्या कोरड्याठाक तलावाचा फोटो घेऊनच आला. अनेक वार्ताहरांच्या ठीक ठाक बातम्या त्याच्या फोटोमुळे हिट ठरल्या अशी अनेक उदाहरणे आता डोळ्यासमोर येतायत. नोकरीसाठी न्यूज फोटो काढताना तो कलात्मक आवड जोपासायचा. २०११ मध्ये पुन्हा एकदा दुष्काळाच्या दौऱ्यावर आम्ही दोघांनी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद असा भगभगीत वातावरणात प्रवास केला. खोटं वाटेल पण अक्षरशः शेकड्याने फोटो काढले त्यानं. तूच दौऱ्यातला मला लोहगड नांद्रा इथला एक प्रसंग आठवतोय. आम्ही एका घरात गेलो. ८५ वर्षांचा एक म्हातारा बसलेला. आल्या आल्या त्यानं पाण्याचा ग्लास पुढे करीत दुष्काळाच्या व्यथा सांगायला सुरुवात केली. त्याच्या नकळत माजेदनं त्याचे अनेक फोटो काढले. भुवया पांढरे झालेल्या त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर पसरलेलं सुरुकुत्यांचं जाळे आणि त्यातून दिसणारे व्यथित डोळे हा फोटो आवंढा गिळायला लावणारा होता. त्यानंतर सारा दिवस तो अस्वस्थ होता. ‘भाई, आपन शहर में रहते, इत्ता सुकून रहता फिर भी कित्ते परेशान रहते..और इन को देखा तो शरम आती अपने पे’ असं तीन तीन वेळा बोलत होता. खूप सेन्सिटिव्ह होता. बीड जिल्ह्यात एका खेड्यात चहा प्यायला थांबलो. टपरीवर खास कप बशीत चहा आला. मस्त बशीत ओतून फुरकत चहा पीत असताना त्यानं माझा नकळत फोटो काढला. तो मला प्रचंड आवडतो…


गणेशोत्सवात एका घरात देवघरात असलेल्या दुर्मिळ गणेश मूर्तीचे फोटो काढायला माझ्यासोबत आला. त्या घरात आल्या आल्या, बाजूच्या हौदाच्या नळाखाली हातपाय, चेहरा धुवून, केसांवरून ओला हात फिरवून तयार झाला. माझी प्रश्नार्थक मुद्रा बघून म्हणाला ‘भाई, देवघर में जा रहे ना आपन, इस लिए..’ इतका निर्मळ होता तो. माझा canon चा पहिला कॅमेरा खरेदी केला तेव्हा तोच आला होता सोबत, सगळं तपासून त्यानेच हक्काने निवडून दिला होता.
२००६ साली कुठल्या तरी स्पर्धेसाठी त्याने एका वृद्धाच्या पाणी तरारलेल्या डोळ्यात दिसणाऱ्या तिरंग्याचा फोटो काढला होता. त्याला बक्षीस मिळालं. तो फोटो आजही माझ्या संग्रही आहे.

दैनिके बदलली, कधी सोबत कामं केली, कधी नाही.. मैत्री कायम राहिली. ‘महेश शिर खुर्मे का प्रोग्राम बनाया, टाइम बोलता मैं, आना पडेगा’ असं
आमंत्रण दिले की पुढे , ‘गुलगुले भी रहेंगे हा’ असं आवर्जून सांगायचा.
आज अशा अनेक आठवणी दाटून येतायत. एकेक करत जिवलग निरोप घेत आहेत आणि आपण असहाय होऊन ते घाव झेलत आहोत, हे जास्त त्रासदायक आहे.
■■◆

महेश देशमुख

9422062494

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]