बांबूपासून फर्निचर, टूथब्रश निर्मिती कारखाना, अटल बांबू डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटनही होणार-पाशा पटेल
*लातूर/प्रतिनिधी* –
पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल राबवित असलेल्या बांबू लागवड या पर्यावरणपूरक चळवळीची दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, या क्षेत्रातील त्यांची तळमळ पाहता, फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून लोदगा (जिल्हा लातूर) येथे उभारण्यात आलेल्या बांबू रोपे निर्मितीची टिशू कल्चर प्रयोगशाळा, बांबूपासून टूथब्रश निर्मितीचा कारखाना आणि इतर महत्त्वपूर्ण योजनांचे लोकार्पण करण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे दि. 5 मे रोजी येत आहेत.

याप्रसंगी बांबूशी निगडीत विविध घटकांचे शहा यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे. सदर लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा दिनांक 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, पाशा पटेल यांचा वाढदिवस 5 मे रोजी असल्याने हा कार्यक्रम 5 मे रोजी आयोजित करण्यास संमती मिळावी, अशी विनंती त्यांनी अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली असता, त्यांनी तत्वता मान्यता दिली.

यावेळी पाशा पटेल यांनी बांबूपासून तयार होणारे कपडे, टी-शर्ट आदींची सविस्तर माहिती देऊन त्यांना टी-शर्ट भेट दिला. इथेनॉलसंदर्भात सांगोपांग चर्चा केली. बांबूचा सहकारात समावेश करावा, अशी विनंती केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लोदगा येथे प्रत्यक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या भल्याचे अनेक निर्णय त्यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता पाशा पटेल यांनी व्यक्त करून, अमित शहा यांनी आपणास अपेक्षित होते त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण मांडलेले मुद्दे गांभीर्याने घेतले, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली.

*या हंगामात 1 कोटी बांबूची रोपे लागवडीचा दिला शब्द*याप्रसंगी चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बांबू लागवड चवळीची माहिती जाणून घेत, या हंगामात बांबूची किती रोपे लावली जाणार, असा प्रश्न त्यांनी केला असता किमान 1 कोटी रोपे लागवडीचा शब्द पाशा पटेल यांनी अमित शहा यांना दिला.*