22.5 C
Pune
Saturday, February 7, 2026
Homeआंतरराष्ट्रीयबीडच्या सुपुत्राचा जागतिक आर्थिक परिषदेत डंका!

बीडच्या सुपुत्राचा जागतिक आर्थिक परिषदेत डंका!

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान;

वर्षभरात ५०० कोटींच्या उद्योग उभारणीबद्दल कौतुक

दावोस (स्वित्झर्लंड)/लातूर : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) बीड जिल्ह्यातील परळीचे सुपुत्र आणि ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी जागतिक स्तरावर आपली ठळक छाप उमटवली.

गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांचे दावोसमध्ये विशेष कौतुक केले.“सामंजस्य करार कागदापुरते न राहता एका वर्षात प्रत्यक्षात उतरू शकतात, याचे भरत गीते हे उत्तम उदाहरण आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

फडणवीस यांच्या हस्ते गीते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अन्य देशांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करून राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील आणि परिसरातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून, ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना मिळाली आहे.बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरत गीते यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण गावी आणि परळीत घेतले. चौथी शिकलेले वडील शेतीसह टेलरिंग व किराणा दुकानाचा छोटेखानी व्यवसाय करीत. काहीकाळ त्यांनी ठेकेदारीचेही काम केले. पुढे पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) येथून अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर जर्मनीत उच्च शिक्षण घेतले. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आत्मसात करून ते भारतात परतले आणि ‘मेक इन इंडिया’च्या भावनेतून उद्योग उभारणीस सुरुवात केली. आज ‘तौरल इंडिया’मार्फत संरक्षण, ऊर्जा, रेल्वे, हेल्थकेअर आणि एरोस्पेससारख्या संवेदनशील क्षेत्रांसाठी अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग निर्मिती केली जात असून सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिकल्स, एबीबी यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विश्वास मराठवाड्यातील उद्योजकावर बसला आहे.

‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.भरत गीते म्हणाले, “तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे. उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल.” मेक इन इंडिया हा भारतीयांसाठी भावनेचा विषय असून, त्याच भावनेतून जर्मनीतील संधी सोडून भारतात परतलो व उद्योग सुरु केल्याचे गीते अभिमानाने सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]