20.8 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeलेख*भीमाशंकरच्या जंगलातला थरार*

*भीमाशंकरच्या जंगलातला थरार*

  • पर्यटन
  साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. मी ज्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो त्या कंपनीचं रिजनल ऑफिस पुण्यात होतं. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला मिटिंगसाठी पुण्याला जावं लागत असे. नोकरीतले ते सुरुवातीचे दिवस. माझा मित्र रवी पुण्यात एका प्लांटेशन कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि आणखी एक मित्र राज मंचरला नुकताच ग्रामसेवक पदावर रुजू झाला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे मी पुण्यात मिटिंग साठी गेलो होतो. मिटिंग नंतर लागूनच शनिवार रविवार आलेला. रवी व राजने नुकत्याच नवीन मोटरसायकल घेतल्या होत्या. सुट्टी असल्यामुळे आम्ही तिघांनी मोटरसायकलवरून भीमाशंकरला जाण्याचा बेत आखला.  
मी आणि रवी त्याच्या गाडीवरून पुण्याहून सकाळी निघून मंचरला पोहोचलो. सोबत माहितगार असावा म्हणून राजने गावातील एक मित्र सोबत घेतला. तिकडे ग्रामसेवकाला 'भाऊसाहेब' असे म्हणतात. तो दिवसभर राजला "भाऊसाहेब! भाऊसाहेब!" असं म्हणून बोलत होता. ऐकताना आम्हाला खूप गंमत वाटत होती.

  भीमाशंकरला पोहोचलो, महादेवाचं दर्शन घेतलं आणि नंतर सायंकाळपर्यंत बाजूच्या जंगलात भटकण्याचं ठरवलं. भीमाशंकरचं जंगल म्हणजे पश्चिम घाटातील जैवविविधतेने समृद्ध असलेला भाग.  
"या भागात नेहमी बिबटे आढळतात" तो गाववाला सांगत होता. आम्हालाही जंगलाचा अनुभव घ्यायची भारी उत्सुकता निर्माण झाली होती. दुपारनंतर बरंच भटकलो. भटकताना वेगवेगळी फुलपाखरं, धनेश (Malabar Grey Hornbill), स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher), हळद्या (Golden Oriole), शिपाई बुलबुल (Red Whiskered Bulbul), वेडा राघू (Little Green Bee-eater), असे काही पक्षी दिसले शिवाय भिमाशंकरचं प्रमुख आकर्षण असलेली शेकरू - उडती खार (Indian giant squirrel) आम्हाला ठीक ठिकाणी दर्शन देत होती. पोटभर श्वास घेत आम्ही मनसोक्त भटकलो. 

आता संध्याकाळ होत आली होती, आकाशात ढग दाटून आलेले दिसत होते. आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आभाळ आणखी गडद होत गेलं आणि अचानक वारा सुटायला लागला. ढगाळ वातावरणामुळे सभोवतालचा प्रकाशही कमी झाला होता. रस्त्यावर समोरचं कमी दिसत होतं म्हणून आम्ही आमच्या मोटरसायकलचे लाईट लावले. राज आणि मी एका गाडीवर होतो आणि रवी व तो गाववाला मित्र साधारण पंचवीस फूट मागे दुसऱ्या गाडीवरून येत होते. राज गाडी चालवत होता, मी मागे बसलो होतो. रस्ता छोटा असल्यामुळे गाडीचा वेग तसा कमीच होता. अचानक राजने गाडीचा वेग आणखी कमी केला आणि मला म्हणाला, “समोर बघ… समोर बघ.” मला कळलं नाही. मी समोर पाहिलं. रस्त्याच्या बाजूला खुरटी झुडुपं होती आणि त्या झुडुपांमधून दोन पिवळसर डोळे चमकत होते. झुडपांमुळे बाकी काही दिसत नव्हतं. विचार करायलाही वेळ नव्हता..‌. आमची गाडी हळूहळू पुढे जात होती. सुरुवातीला अंदाजे पंधरा- वीस फुटावर असलेले ते डोळे अगदी जवळ आले आणि समोरील दृश्य नजरेस पडलं… बाजूच्या झुडपात अगदी पाच फुटांवर एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या उभा होता. रस्ता क्रॉस करण्यासाठी निघाला असता आमच्या गाडीचे लाईट पाहून थबकला असावा. त्याची उभं राहण्याची पद्धत पाहता असे वाटले की तो कुठल्याही क्षणी समोरच्यावर झेप घेणार. अचानक समोर आलेला तो धष्टपुष्ट बिबट्या पाहून
अंगात भीतीने शहारे आले. काही बोलण्याचं भानच राहिलं नाही. श्वास रोखला गेला, मनात आपसूक देवाचा धावा सुरू झाला. पाहता पाहता आमची गाडी त्याच्या समोरून पुढे गेली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.

पण आता काळजी होती ती थोड्याच अंतरावर आमच्या मगे असलेल्या रवी आणि त्या गाववाल्याची. त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. ओरडून सांगताही येत नव्हतं. मी कसेतरी खुणावून रवीला झुडुपाकडे बघण्यास सांगितलं. रवीच्याही लक्षात आलं की तिथं काहीतरी गडबड आहे. रवी सावध झाला त्यांनेही गाडीचा वेग थोडा कमी केला. आता त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही देवाचा धावा करू लागलो. बिबट्या अजूनही त्याच स्थितीत उभा होता. सुदैवाने रवीचीही गाडी तिथून पास झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. काहीही न बोलता सुसाट खालच्या दिशेने निघालो. काही बोलण्याचं भानच नव्हतं. कधी एकदा एखाद्या जवळच्या गावाजवळ पोहोचतो असं झालं होतं. सभोवताली निर्जन प्रदेश. अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगामुळे मनात दाटलेली भीती. आम्ही शक्य तितक्या वेगाने परतत होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला. हा पाऊस आमच्यासाठी जरा वेगळाच. अक्षरशः सुई टोचल्यासारखे थेंब अंगाला टोचत होते‌. आम्ही तिघेही मराठवाड्यातले. मराठवाड्यात पाऊस बेताचाच पडतो. पश्चिम घाट किंवा कोकणातल्या पावसाची आम्हाला सवय नव्हती. आज अगोदरच घाबरलेली अवस्था आणि त्यात हा पाऊस अक्षरशः टोचायला लागला. गाडी चालवणंही अवघड जात होतं. पावसाची कल्पना नसल्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे काहीच सोबत घेतलेलं नव्हतं. अक्षरशः पावसाच्या सुया टोचून घेत आम्ही पुढे निघालो. कुठे थांबताही येत नव्हतं. थंडी आणि भीतीने अंग गारठलेलं होतं. सर्कस किंवा प्राणी संग्रहालयात एखादा प्राणी पाहणे आणि अशा मोकळ्या जंगलात अगदी पाच फुटांवर असा हिंस्र प्राणी अचानक समोर येणे यात खूप फरक आहे. वाघ, सिंह आणि बिबट्यांमधला फरक माहीत होताच. बिबट्या हा तसा व्हल्नरेबल प्राणी. माणसावरही आक्रमण केल्याच्या बऱ्याच घटना वाचनात होत्या. कसे तरी करून खालच्या एका गावाजवळ पोहोचलो. रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा हॉटेल होतं तिथे थांबलो. पावसामुळे नखशिखांत भिजलेली अवस्था. चहा करायला सांगितला. आमची चर्चा ऐकून हॉटेलवाल्याने विचारलं, “काय झालं?” आम्ही त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो म्हणाला, “या भागात बिबट्या आढळतोच. तुम्ही सुरक्षित परत आलात ही भीमाशंकराची कृपा.”
चहा पिऊन कसेबसे मंचर गाठले आणि एका सुरक्षित जगात परत आल्याची जाणीव झाली.

   पक्षी निरीक्षण आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी नंतरच्या काळात मी वेगवेगळ्या जंगलात भरपूर पायपीट केलेली आहे. जंगलात दिवस दिवस भटकलो आहे. पण भीमाशंकरच्या जंगलाचा आयुष्यातला तो पहिला अनुभव कधीच विसरू शकत नाही. 
  • व्यंकटेश कुलकर्णी
  • हैदराबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]