सूर निरागस हो…❤️
सकाळी सारं घर साखरझोपेत असताना आपण दिवसाचं वेळापत्रक मनाशी जुळवत ज़रा गडबडीतच बाल्कनीत यावं अन् तेवढ्यात शेजारच्या खिडकीतुन सुरेल आवाजात ” मागे उभा मंगेश” कानावर पडावं. गाणं संपेपर्यंत मग तिथुन हलताच येत नाही. एक नविन ऊर्जा मिळाल्यासारखी होते आणि पुढची सगळी कामं झटदिशी होतात.
एखाद्या अशक्य ट्रैफिक जॅम मध्ये आपण अडकलेलो असावं , कंटाळ्याचा परमोच्च क्षण आलेला असावा आणि FM वर मेहदी हसन चं “रंजीश ही सही” लागावं. बाहेर काय चालु आहे याच्याशी काही देणं घेणं रहात नाही.
रद्दीच्या, चांभाराच्या, ऑल्टरच्या, किंवा तत्सम दुकानात थांबलो असताना तिथल्या जुन्यापान्या रेडियो वर “दिल का भंवर करे पुकार” लागावं. अचानक तो नीरस कार्यक्रम सुखकर बनुन जातो. गाणं संपेपर्यंत हे काम होऊच नये असं वाटत राहातं.
डॉक्टरकड़े आपल्या अपॉइंटमेंटची वाट बघत असताना , लहान मुलांची कीरकिर एकीकडे चालु असताना , थोड्याश्या टेंशनयुक्त अश्या वातावरणात आपला फोन बाहेरच्या डेस्कावर विसरून आत गेलेल्या रीसेप्शनिस्टच्या मोबाइलची रिंगटोन ” दिल तो है दिल ” वर वाजत राहते आणि आपण इथे एखादं दुखणं घेऊन आलो आहोत याचा संपुर्ण विसर पडतो.
ऑफीस मधली कामं उशिरापर्यंत संपवून एखाद्या संध्याकाळी दमुन भागुन घराकडे जायला निघावं ,अन् सोसायटीच्यामधल्या एखाद्या झाडाखाली बसलेल्या मुलांच्या घोळक्यातून गिटारचे स्वर आणि ” Give me some sunshine” कानावर पडावं. दिवसभराचा थकवा जणु एका सेकंदात निघून जातो , पावलं थोड़ा वेळ तिथेच रेंगाळतात अन् आपल्या घरट्याकड़े झेपावायला नव्या उमेदित वळतात.
संगीतात जादू आहे म्हणतात ते काही खोट नव्हे.
जिथे शब्द संपतात तिथे संगीत बोलते…

जयंती देशमुख
अकोला




