*आपत्ती काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*
*लातूर, दि. १७ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीची भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही गतीने केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त लातूर येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. प्रारंभी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदनेनंतर ध्वजवंदन करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमकर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रमुख शेतपिकांचे नुकसान झाले असून, घरांची पडझड, शेतजमीन खरडून गेली आहे. या नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही केली जाईल. पुढील काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क असून नागरिकांना आवश्यक मदत करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात ३०० आपदा मित्र स्वयंसेवक प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा दिवस आहे. मराठवाडा मुक्तिलढ्यात लातूरकरांचे अमूल्य योगदान आहे. रझाकार आणि निजाम सैन्याविरुद्ध लातूर जिल्ह्यात औराद, निलंगा, हाडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी यासारख्या विविध ठिकाणी थरारक लढाया झाल्या. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार आदी सर्वांनीच या लढ्यात सहभाग घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांचा नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांच्या मध्यस्थीने यश मिळाले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलिस ॲक्शन सुरू झाले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवून जिल्ह्याच्या विकासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबवला जाणार आहे. या अंतर्गत पाणंद आणि शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, नोंदणी, मोजणी आणि सीमांकनासह वादांचे निराकरण करण्यासाठी रस्ता अदालतीचे आयोजन होईल. ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमांतर्गत सरकारी जमिनीवर घरकुलांसाठी कब्जा हक्क, झोपडपट्टी अथवा अतिक्रमण नियमितीकरण आणि पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप केले जाईल. नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच याच कालावधीत ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. या अभियानात राज्यात दहा लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार केले जाणार आहेत. यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर मोफत शिबिरांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमामुळे गरजू आणि वंचितांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या २५ शासकीय वसतिगृहांमध्ये २ हजार ८४५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर आहे. लातूर अतिरिक्त एमआयडीसी येथे बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीत २५० विद्यार्थ्यांसाठी आणि यापूर्वी कार्यरत वसतिगृहांमध्ये आणखी १४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कुणबी जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.*‘मराठवाडा मुक्तिलढा’ कॉफीटेबल बुकचे प्रकाशन*मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील महत्वपूर्ण घटनांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या ‘मराठवाडा मुक्तिलढा’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाडा मुक्तिलढ्याचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने ही सचित्र पुस्तिका तयार केली आहे. इतिहास अभ्यासक विवेक सौताडेकर आणि भाऊसाहेब उमाटे या पुस्तिका निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याबद्दल त्यांचा, तसेच मुद्रक किरण कुलकर्णी यांचा यावेळी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*****




