लातूर/प्रतिनिधी: मान्यवरांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने मागील १७ दिवसांपासून सुरू असणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे व देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महाआरती करण्यात आली.यानंतर फटाक्यांच्या नयनरम्य आतिशबाजीला सुरुवात झाली.महाशिवरात्री रोजी दि.८ मार्च पासून सुरू असणाऱ्या यात्रा महोत्सवाची सांगता झाली.यावेळी वृंदावन येथील हभप जनार्दन महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.यावेळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.

महाशिवरात्रीपासून अतिशय हर्षोल्हासात यात्रा महोत्सव संपन्न झाला.या कालावधीत मान्यवरांसह लाखो भक्तांनी श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले.दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्यासह विविध सोयी-सुविधा देवस्थानने उपलब्ध करून दिल्या होत्या.जिल्ह्यातील हजारो नागरिक,युवक- युवती व अबालवृद्धांनी यात्रेचा आनंदही लुटला. विविध प्रकारचे रहाटपाळणे तसेच इतर माध्यमातून या महोत्सवाचा आनंद घेत खरेदी केली.

समारोप प्रसंगी संपन्न झालेली महाआरती व आतिषबाजीच्या प्रसंगी अशोक भोसले,सुरेश गोजमगुंडे,नरेश पंड्या, विशाल झांबरे
व्यंकटेश हालिंगे,ओम गोपे,दत्ता सुरवसे यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.











