*महाळग्रा येथील शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
लातूर;-चाकूर तालुक्यातील महाळग्रा येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांचे विजेचा धक्का बसल्याने निधन झाले होते. या संकटसमयी शिंदे कुटुंबाला शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महावितरणच्या वतीने मंजूर करण्यात आलेला ३ लाख ८० हजार रुपये मदत निधीचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

शेतकरी शिवाजी शिंदे यांच्या निधनानंतर सहकार मंत्री श्री. पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले होते व शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.या पाठपुराव्याला यश येऊन महावितरणकडून मदत निधी मंजूर करण्यात आला. सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते हा धनादेश शिंदे यांच्या वारसांना वितरित करण्यात आला. या प्रसंगी महावितरणचे उपविभागीय अभियंता कुणाल पेन्सलवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने आदी उपस्थित होते.




