*मोदी सरकारची विकासगंगा गावागावात पोहचवली ः खा. शृंगारे*

0
134

भादा/प्रतिनिधी : लातूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने राबविलेली विकास गंगा मतदारसंघातील प्रत्येक गावांत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मागील पाच वर्षात आपण केला आहे. केवळ प्रसिध्दीच्या झोतात न राहता विकास कामावरच लक्ष केंद्रीत केले असून याच बळावर मी आपल्याकडे पुन्हा एकदा मत मागण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन खा. सुधाकर शृंगारे यांनी केले.

भादा येथे आयोजित प्रचार सभेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, कवाडे गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे हे बोलत होते. या सभेस युवा नेते ऋषिकेश कराड, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, मनसेचे शिवकुमार नागराळे, शिवसेनेचे गोविंद माडजे, रेणवसिध्दाप्पा पाटील, पद्माकर चिंचोलकर, बालाजी शिंदे, गुणवंत कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. शृंगारे म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या काळात लातूर मतदारसंघात महामार्गांचे जाळे तयार झाले आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे म्हणून पेयजल योजना मंजूर करण्यात आली आहे. गरजवंतांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून लातूर मतदारसंघाला आवश्यक असणार्‍या सर्व विकास योजनांची अमलबजावणी आपण केली आहे. ही कामे करताना मी कधीही स्वतःची प्रसिध्दी केली नाही. केवळ कामच करत राहिलो. मी केलेली कामे जनतेसमोर आहेत. त्यावरच जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही खा. शृंगारे यांनी यावेळी बोलताना केले.


मनोगत व्यक्त करताना ऋषिकेश कराड म्हणाले की, ही निवडणुक देशासाठी महत्वाची आहे. विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही तर भाजपा विकासावर बोलत आहे. देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातील सरकारच येणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मोदींच्या सरकारमध्ये काम करणारा प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे. देशासोबतच लातूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी शृंगारे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेचे सूत्रसंचलन राजकिरण साठे यांनी केले. यावेळी सतीश कात्रे, योगेश लटुरे, देवराव मोहीते, बब्रुवान बंडगर, संजय शिंदे, श्रीनाथ बंडगर, गिरीष पवार, महादेव गुरुशेट्टी, फुलचंद अंधारे, वाजीद पठाण, उध्दव काळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here