27.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeदिन विशेषमौखिक रोग आणि...

मौखिक रोग आणि…

लेख.. ( दिन विशेष)

मुख – शल्य चिकित्सेतून मौखिक रोगांचे समूळ उच्चाटन

लेखन: डॉ. अमोल डोईफोडे,

मुख – शल्य चिकित्सा तज्ज्ञ,

माईर्स एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, लातूर

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीतून विविध आजार निर्माण होत आहेत. अशा आजारांमुळे शरीरावर होणाऱ्या प्रादूर्भावाचे परिणाम चेहऱ्यावर, तोंडावर व दातांवरती प्रकर्षाने होऊन मौखीक रोगांची गुंतागुंत वाढत आहे. परिणामी तोंडातील, दातांमधील रोगातही वाढ होत आहे. तोंडातील प्रमुख जबडा, दात, हिरडी, ओठ व गाल यांना जडलेला कर्करोग, जबड्याच्या गाठी, निखळलेला सांधा, अडकलेली अक्कल दाढ, चट्टे, व्रण अशा रोगांचे समूळ उच्चाटन मुख – शल्य चिकित्सेतून करता येते.

जगभरात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुख – शल्य चिकित्सा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मुख – शल्य चिकित्सेविषयी वेध घेणारा हा लेख…

मुख – दंत रोगाची लक्षणे

प्रामुख्याने मुख व दंत रोगात अचानक दातामध्ये वेदना होणे, हिरड्यांवर सुज येणे, पु येणे, जबड्यामध्ये गाठ तयार होणे, तोंडात चट्टे, व्रण येणे, तोंड कमी उघडणे अशी लक्षणे दिसून येतात. तोंडातील अशा आजारांचे वेळीच निदान न झाल्यास रुग्णास मोठ्या हानीस सामोरे जावे लागते.

मुख – दंत रोग उद्भवण्याची कारणे

मौखीक अस्वच्छता, बदलती जीवनशैली, अपूर्ण झोप, संतुलीत आहराचा अभाव, व्यसनाधिनता, अपघात आणि प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष या कारणांमुळे मुख – दंत रोग उद्भवतात.

मौखिक रोगांचे अचूक निदान आवश्यक

तोंडाचे अथवा दातांचे आजार अढळून आल्यास मुख – शल्य चिकित्सकाकडे दाखवून आजाराचे अचुक निदान करुण घेणे गरजेचे असते. काही रुग्णांमध्ये आवश्यकनुसार क्ष – किरण तपासणी, रक्त तपासणी, बायप्सी, गाठीतील पाण्याची तपासणी करुन आजाराचे निदान होणे आवश्यक असते.

मुख – दंत रोगावर उपचार

संपूर्णता खराब झालेल्या दातांवरती दात काढण्याशिवाय दूसरा पर्याय शिल्लक नसतो. अलीकडील काळातील आजारांतील बदलांमुळे काही रुग्णांत जबड्यातील अपुऱ्या जागेमुळे अक्कल दाढेच्या वाढीमध्ये अडथळे निर्माण होऊन तिव्र वेदना होत आहेत. अशा रुग्णांच्या अक्कल दाढेवर शस्त्रक्रिया करुन अजुबाजूंच्या दातांची हानी टाळता येते.

लहान मुलांमध्ये खेळताना अपघात होऊन तोंडात, दातांत इजा होते. इजा झालेल्या भागाचा रक्त पुरवठा खंडीत होऊन दात संपूर्णता निर्जीव होतात, दातांचा रंग बदलून दातांखाली, ओठामध्ये लहान – लहान गाठी तयार होतात. असे दात व गाठींवर शस्त्रक्रिया करुन उपचार करता येतात.

      सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अपघातात लक्षणीय वाढ होवून शरीर, चेहरा, जबडा व दातांचे भरुन न येणारे नुकसान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने अपघातात खालचा – वरचा जबडा तुटून चेहऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. अशा रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध झाल्यास अपघातामुळे बिघडलेला चेहरा, जबडा शस्त्रक्रिया करुन पुर्ववत करता येतो.

अतिरिक्त प्रमाणातील व्यसनाधिनतेमुळे हिरड्या, जबडा, दाताचे हाड, गाल, ओठ, जिभ या भागास कर्करोग अढळून येत आहे. अशा स्वरुपातील कर्करोगास वेळीच प्रतिबंध  व उपचार न केल्यास रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येते. तोंडाच्या कर्करोगात शस्त्रक्रिया बरोबर रेडीओ, किमोथेरपी उपचाराची गरज भासू शकते. कर्करोगाच्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ईम्यूनो ही अत्याधुनिक थेरपीही दिली जाते.

जबड्याच्या अपुऱ्या वाढीमुळे बिघडलेली ठेवून शस्त्रक्रियेद्वारे व्यवस्थित करता येते. लहानापासून ते ज्येष्ठापर्यंत अनेकांना तोंडाच्या आतील ओठांचा आणि गालाचा भाग चावला गेल्याने सुध्दा लाळीच्या ग्रंथीच्या गाठी वारंवार निर्माण होतात. अशा गाठी वर शस्त्रक्रियेव्दारे उपचार करता येतात. तसेच तोंडाच्या विविध आजारांची कारणे ओळखून शस्त्रक्रिया करुन आजाराचे मुळासगट निर्मूलन करता येते.

मुख रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय फायदेशीर

तोंडात निर्माण होणारे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया या अत्यंत गुंतागुंतीच्या असल्याकारणाने अशा आजारावर प्रतिबंधात्मक उपचार फायदेशीर ठरतात. कर्करोगासारख्या दूर्धर आजारावर एवढे संशोधन होऊनही कर्करोगामुळे होणारी हानी टाळता येत नाही. त्यामुळे कर्करोग उद्भवू नये म्हणून व्यसनांपासून दूर राहावे. वाहन चालवताना सुरक्षा उपायांचा अवलंब करावा. जेणेकरून अपघातामुळे होणारी हानी टाळता येईल. लहान वयात झालेल्या इजांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच वेळोवेळी तोंड व दातासबंधी उद्भवणाऱ्या आजाराविषयी जागरूक राहून उपचार घ्यावेत.

शब्दांकन : श्रीधर घुले, लातूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]