32.3 C
Pune
Wednesday, March 25, 2026
Homeसाहित्य*यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार गिरीश कुबेर यांना जाहीर*

*यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार गिरीश कुबेर यांना जाहीर*


नांदेड ; (संजीव कुळकर्णी यांजकडून )


यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दैनिक लोकसत्ता चे संपादक तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे जाणते अभ्यासक-विश्लेषक गिरीश विनायक कुबेर यांना जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ५१ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १३ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत होणार्‍या कार्यक्रमात तो कुबेर यांना प्रदान केला जाईल, असे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता पानट यांनी जाहीर केले आहे.
मराठवाडा वृत्तपत्राचे संपादकपद दीर्घकाळ भूषविणार्‍या अनंत भालेराव यांचे निधन १९९१ साली झाले. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणार्‍या या पुरस्काराला महाराष्ट्रभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अनंतरावांनी ज्या हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात कृतिशील योगदान दिले, त्या संग्रामाच्या अमृतमहोत्सवी पर्वातील यंदाचा हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीस दिला जावा, असे प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने निश्चित केल्यानंतर समोर आलेल्या काही नावांमधून कुबेर यांचे नाव एकमताने निश्चित झाले.


विश्वस्त मंडळाच्या बैठकीस अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, न्या.नरेंद्र चपळगावकर, डॉ.सुधीर रसाळ, प्रा.प्रताप बोराडे, डॉ.प्रभाकर पानट, संजीव कुळकर्णी, डॉ.मंगेश पानट, डॉ.सुनीता धारवाडकर, श्रीकांत उमरीकर व डॉ.सविता पानट उपस्थित होते.
प्रतिष्ठानचा हा पुरस्कार स्वीकारण्यास गिरीश कुबेर यांनी संमती कळविली असून हा आपला मोठा गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमातील पहिला पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्याच संपादकीय संस्कारांखाली पत्रकारिता क्षेत्रात नावारूपास आलेल्या कुबेर यांचा आता गौरव होत आहे.
कुबेर गेली साडेतीन दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्स, इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रांत अनेक वर्षे महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्यानंतर मागील एक तपापासून ते लोकसत्ता दैनिकाचे संपादकपद भूषवित आहेत. वृत्तपत्रीय लिखाणाशिवाय कुबेर यांनी वेगवेगळ्या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची अधर्मयुद्ध, एका तेलियाने, टाटायन, युद्ध जीवांचे, तेल नावाचे वर्तमान ही ग्रंथसंपदा वाचकप्रिय ठरली आहे. ‘लोकसत्ता’तील त्यांच्या निवडक अग्रलेखांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या टाटायन या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]