उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय इमारतींची कामे गुणवत्तापूर्ण करावीत
राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर, दि.28(जिमाका):- उदगीर विधानसभा मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यात विविध शासकीय इमारती बांधकामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व शासकीय इमारतीचे कामे अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व ही सर्व कामे संबंधित गुत्तेदाराकडून विहित कालावधीत पूर्ण करून घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश संसदीय कार्य, पाणीपुरवठा, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध कामा विषयी आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कांडलीकर, उपअभियंता देवकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अभियंता श्री. कायंदे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग या अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेऊन मंजूर असलेली सर्व कामे तात्काळ सुरू करावीत व जे कामे यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहेत ती कामे विहित मुदतीत संबंधित गुत्तेदार यांच्याकडून पूर्ण करून घ्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे. तसेच उदगीर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली सर्व विकासात्मक कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या. यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून सुरू असलेल्या सर्व शासकीय कामांची माहिती राज्यमंत्री महोदयांना देण्यात आली व ही सर्व कामे विहित मुदतीत व दर्जेदार करून घेतली जातील असे सांगितले.
********

कोविड-19 च्या निर्बंधाबाबत शिथिलता नाही
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज
· जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये
लातूर, दि.28(जिमाका):- जिल्ह्यात कोविड-19 च्या अनुषंगाने कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने लेव्हल – ३ चे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्वी दिलेल्या आदेशानुसार आस्थापना व बाजारपेठ सुरू राहणार आहे. या नियमावलीत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाने पूर्वी दिलेले आदेश कायम असतील, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.











