आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; भादा ते काळमाथा या रस्त्याचे लोकार्पण
—-
लातूर : माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांचा मतदारसंघ अशी ‘लातूर ग्रामीण’ची विधानभवनात ओळख आहे. त्यामुळे राज्यात मंत्री कोणीही असो ‘लातूर ग्रामीण’ला कायमच झुकते माप मिळते, असे प्रतिपादन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केले. काळमाथा येथील श्री हनुमान मंदिर सभागृहाचे काम आमदार निधीतून केले जाईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून (रा. मा. २३९) भादा ते काळमाथा या रस्त्याचे लोकार्पण व गावांतर्गत पेव्हर ब्लॉक रस्त्याचा शुभारंभ आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाला. तसेच, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन प्रमोद जाधव, सदाशिव कदम, काळमाथा सरपंच बालाजी मोहिते, सोमनाथ मोहिते, उपसरपंच शाम शेळके, रामचंद्र शेळके, विश्वनाथ पाटील, कंत्राटदार अमोल देशमुख, थडकर, गोविंदराव कदम, दत्तात्रय शेळके, दगडू ढोले, रमाकांत कांबळे, श्रीकृष्ण माने, दगडू मुळे, शाम शेळके आदी उपस्थित होते.

आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र काही महिन्यांनी कोरोनारुपी संकट कोसळले. या संकटाचा यशस्वी मुकाबला महाविकास आघाडी सरकारने केला. राज्यात अद्ययावत आरोग्य सुविधा उभी करून जनतेचे जीव वाचवण्याचे सर्वात मोठे काम सरकारने केले. हे काम जनता कधीही विसरणार नाही, याची मला खात्री आहे.
औसा तालुक्यातील आपल्या मतदारसंघात येणाऱ्या गावातील प्रमुख रस्त्यांचे जाळे आम्ही विकसित करू शकलो. दळणवळणाला गती देण्याचे काम आम्ही केले, असे सांगून आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांची निधीअभावी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ‘लातूर ग्रामीण’मधील 500 किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मतदारसंघातील रस्त्याची अनेक कामे आम्ही मंजूर करून आणली. याचे समाधान आहे. येणाऱ्या काळातही उर्वरित विकासकामे हाती घेवून मार्गी लावू.
स्थानिक विकासाचे हे ‘मांजरा मॉडेल’ :
श्री. शिवराज चाकूरकर, श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर, श्री. विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे आपल्या भागाचा विकास झाला. या नेतृत्वाच्या व काँग्रेसच्या मार्गावरून आपण पुढे जात आहोत. माजी मंत्री, सहकारमहर्षी श्री. दिलीपराव देशमुख, माजी पालकमंत्री श्री. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याचा विकास सध्या सुरू आहे. मागील हंगामातील ऊस उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन चालू गळीत हंगामात आम्ही 102 शुगरकेन हार्वेस्टरचे वाटप केले. शेतकरी उद्योजक निर्माण करण्याबरोबरच साडेतीन हजार रोजगार उपलब्ध केला. स्थानिक विकासाचे हे मांजरा मॉडेल आहे. येत्या काळातही याच पद्धतीने आम्हाला विकास करायचा आहे, असेही ते म्हणाले.
—