लातूर मनपाच्या सभेत मह

0
319

 

महिला व विद्यार्थिनींना सिटीबस प्रवास मोफत

अनियमित बांधकामासाठी अभय योजना, दंड माफ

शहरांतर्गत ५ जलकुंभसह नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करिता मंजुरी

शहरालगतच्या ग्रामीण वस्त्यांमध्ये कचरा व्यवस्थापन मनपा करणार

नर्सिंग होम नूतनीकरण तात्काळ परवाना

प्रत्येक प्रभागात होणार भाजीमंडई

भूखंड व गुंठेवारी नकाशे मनपा द्वारे मोजणी करून प्रमाणित करण्यात येणार.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत शिफारस

कुष्ठरोगी निर्वाह भत्ता १००० वरून ३०००

शहरातील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात येणार

ई वाहन धोरणास मंजुरी, चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात सूट

बेघरांसाठी रात्र निवारा उभारण्यास मंजूरी

लातूर/प्रतिनिधी: लातूर शहरातील महिला व विद्यार्थिनींना मोफत सिटी बस प्रवास, शहारा लगतच्या ग्रामीण वस्त्यांमध्ये मनपाच्या वतीने कचरा व्यवस्थापन करण्यास, गुंठेवारी प्रमाणपत्रावरून प्लॉटची नोंदणी व खरेदीखत होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर छोट्या प्लॉटधारकांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय मनपाच्या मंगळवारी (दि.१२ ऑक्टोबर)झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मनपाच्या अभियंत्याकडून तसेच नोंदणीकृत खाजगी सर्वेअर कडून केलेल्या मोजणीला नगररचना विभागाकडून प्रमाणित करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. छोट्या प्लॉटधारकांसाठी ऐतिहासिक म्हणावा असाच हा निर्णय आहे.

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेली ही पहिलीच सभा ठरली. विविध कारणांनी ऐतिहासिक ठरलेल्या या सभेत तसेच निर्णयही घेण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याकरिता शासनास शिफारस करण्यास, शहरातील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यास, शहरात ई वाहनास चालना देण्याकरिता धोरण राबविण्यास व चार्जिंग स्टेशन विकसित केल्यास मालमत्ता करात सूट देण्यासही मंजुरी देण्यात आली. मनपाच्या जागांवर देखील चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात येणार आहेत. यासह शहरातील रुग्णालयांना नर्सिंग होम परवाने देणे, महिला व विद्यार्थिनींना सिटी बस प्रवास मोफत देणे, प्रत्येक प्रभागात भाजीमंडई विकसित करणे व कर्मचाऱ्यांचे स्वंतत्र पेन्शन खाते तयार करणे, तसेच महानगरपालिकेच्या शाळांचे नामकरण करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. मनपाचा दशकपूर्ती महोत्सव साजरा करणे व त्यासाठी नागरी समितीचे गठन करण्यासही या सभेने मंजुरी दिली.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेसाठी एकूण ३४ विषय पटलावर ठेवण्यात आले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या सभेत सदस्यांनी सर्व विषयावर चर्चा करून आपली मते मांडली.

छोट्या प्लॉटधारकांसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा गुंठेवारीचा निर्णय या सभेत घेण्यात आला. गुंठेवारी प्रमाणपत्रावरून प्लॉटची नोंदणी होत नसल्याने मनपाच्या अभियंत्याकडून तसेच खाजगी नोंदणीकृत सर्वेअरकडून केलेली मोजणीही नगररचना विभागाकडून प्रमाणित करण्याचा निर्णय या सभेने घेतला. शहरातील बांधकामांना सर्व्हे न करता देण्यात आलेल्या सरसकट दिलेल्या सर्व नोटिसा निष्कासित करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. अनियमित बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी करून मगच कारवाई केली जाईल. दंडात्मक कारवाईला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अभय देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. केवळ बांधकाम परवान्याचे शुल्क भरून बांधकाम नियमित करत येणारा आहे.

बॉम्बे नर्सिंग ॲक्ट नुसार नर्सिंग होमना पुढील १० वर्षाकरिता परवाने देण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविण्यात मंजुरी देण्यात आली. तसेच पुढील तीन महिन्यांकरिता तत्काळ नूतनीकरण करण्यात येणार आहे. शहराच्या गाव भागातील सिमेंटची जुनी जलवाहिनी बदलणे, नव्या भागात जलवाहिन्या टाकणे, ५ जलकुंभ बांधण्यास मंजुरी देण्यात आली. प्रसातवित हद्दवाढ मधील शहरालगतच्या वस्तीमध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाणी आरक्षणात वाढ तसेच उजनीचे पाणी आणण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार हमीपत्र देण्यास सभागृहाने मंजुरी दिली परंतु यासोबतच पाणीपट्टी वाढविण्यास मात्र नकार देण्यात आला.

कुष्ठरोग्यांचा निर्वाहभत्ता १००० वरून ३००० करण्यात आला. स्वयंसहाय्यता बचतगटांना प्रत्येक प्रभागात आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक जागा देण्यास सभागृहाने विषयालाही सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. बेघरांसाठी शहरात विविध ३ ठिकाणी रात्र निवारे विकसित करण्यात येणार आहेत. संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यास महर्षी बाबा बोरगावकर पुरस्कार यावर्षीपासून देण्याचा निर्णय घेतानाच लातूर मनपाचा दशकपूर्ती महोत्सव साजरा करण्यासह एकूण सर्वचविषयांना साधक-बाधक चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. मनपाच्या कर्मचाऱ्यांना गणवेश देणे, यासह नव्याने बांधण्यात आलेल्या सभाग्रहात ज्येष्ठतेनुसार आसन निश्चिती करण्यासह विविध विषयांना या सभेने मंजुरी दिली.

खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. महिला सदस्यांना त्यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. सर्वसाधारण सभेस उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते दीपक सुळ, सभागृहनेते शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती दीपक मठपती, परिवहन समिती सभापती मंगेश बिराजदार यांच्यासह मनपा सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

 

महिला व विद्यार्थिनींना मोफत प्रवास…

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार शहरातील महिला व विद्यार्थिनींना मोफत सिटीबस प्रवास उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. अशा प्रकारचा निर्णय घेणारी लातूर ही राज्यातील पहिलीच मनपा असल्याचे पीठासीन अधिकारी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशीन बसवण्यासह वाहक म्हणून महिलांना प्राधान्य देणे, प्रत्येक थांब्यावर सिटीबसचे वेळापत्रक लावण्याचा निर्णयही या सभेने घेतला. लवकरच याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्रत्येक प्रभागात भाजीमंडई

शहरातील नागरिकांना भाजी खरेदीसाठी दूरपर्यंत जावे लागू नये यासाठी प्रत्येक प्रभागात एक भाजीमंडई विकसित करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. प्रभागातील ग्रीन बेल्टच्या जागेत ही भाजी मंडई विकसित केली जाणार असून यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

मनपा शाळांचे नामकरण…

शहरातील मनपाच्या शाळांना आता क्रमांकानुसार ओळखले जाणार नाही. प्रत्येक शाळेला महापुरुषाचे नाव दिले जाणार आहे. त्यानुसार मनपा शाळा क्रमांक ९ ला यापुढे सावित्रीबाई फुले विद्यालय असे संबोधण्याचा निर्णयही या सभेने एकमताने घेतला.

 दशकपूर्ती महोत्सव …

२५ ऑक्टोबर रोजी लातूर मनपास १० वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्ताने मनपाचा दशकपूर्ती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. विविध प्रकारच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या अंतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी मनपा सदस्य व शहरातील प्रतिष्ठितांची नागरी समिती गठीत केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here