लातूर लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध; नामनिर्देशन पत्रे १९ एप्रिलपर्यंत स्वीकारली जाणार-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि.१२ : ( वृत्तसेवा ) -लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात झाली आहे. त्यानुसार १९ एप्रिलपर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांची यावेळी उपस्थिती होती .
लातूर लोकसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विविध पथके आणि समित्या गठीत करण्यात आल्या असून आदर्श आचारसंहिता अंमलबावणी प्रभावीपणे केली जात आहे. २० एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ७ मे २०२४ रोजी सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होणार आहे, अशी माहिती श्रीमती ठाकूर- घुगे यांनी दिली.

४१-लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर, लातूर शहर, निलंगा व लोहा असे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदासंघात १९ लाख ७७ हजार ५५ एवढे मतदार आहेत. त्यात १० लाख ३३ हजार ७३० पुरूष, ९ लाख ३९ हजार ८९६ महिला तर ६१ तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच ३ हजार ३६८ सैनिक मतदार आहेत. मतदार संघात ३६ हजार ६५८ मतदार हे ८५ वर्षांवरील आहेत, तर १७ हजार ५५९ मतदार दिव्यांग आहेत. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ३६ हजार १७१ इतकी आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर लातूर लोकसभा मतदारसंघात ६४ हजार ३९ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली..
मतदारसंघात ८५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेले मतदार आणि ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना घरूनच टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. यासाठी त्यांनी १७ एप्रिलपर्यंत १२ (डी) अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)यांच्याकडे भरून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार निवडणूक अधिकारी घरी येवून मतदान करून घेतील. या अर्जाचा नमूना लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवायांबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर सायबर सेलद्वारे नजर ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.




