लोकनेते विलासराव देशमुखांना समर्पित स्वरविलास संगीत दरबार रंगला
*शास्त्रीय गायन व पखावज वादनाने लातूरकर मंत्रमुग्ध*
लातूर ( प्रतिनिधी ):-आवर्तन अष्टविनायक प्रतिष्ठान व मांजरा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित स्वरविलास संगीत दरबारास उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दिली दाद*लातूर दि.२०.राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित स्वरविलास संगीत दरबार व आवर्तनची १२६ वी मासिक सभा दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी दयानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.

ही मैफल लोकनेते विलासराव देशमुख यांना समर्पित करण्यात आली होती. किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेवूंडी यांच्या गायनाने लातूरकर रसिकांना एक अप्रतिम सुरेल मेजवानी अनुभवायला मिळाली तब्बल साडे तीन चाललेल्या संगीत मैफिलीला लातूरच्या रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिलीयावेळी संगीत मेजवानीचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मंत्री मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब हे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष आकाशजी राठी तसेच आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव रविराज पोरे, व आवर्तन चे कार्यक्रम नियोजन प्रमुख माजी नगरसेवक विशाल जाधव हे होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले.

मैफिलीच्या सुरुवातीला लातूर येथील प्रसिद्ध व अभ्यासू गायिका विदुषी डॉ. सौ. वृषाली देशमुख यांच्या गायनाने झाली त्यांनी सुरुवातीला राग गौड मल्हार – जयपूर घराण्याची विलंबित तीनतालातील पारंपरिक बंदिश ‘मान न करीये गोरी...’ आणि त्याला जोडून द्रुत बंदिश “ऐसो आयो बैरी बदरा … ” गायली, त्यानंतर संत धर्मदास यांचे भजन गाऊन आपल्या सुमधुर गायनाची सांगता केली. त्यांना संवादिनीवर प्रसिद्ध युवा कलाकार यश खडके यांनी व तबला साथ संगत लातूर येथील प्रसिद्ध युवा तबलावादक समीहन जोशी यांनी अतिशय समर्पक अशी केली. त्यानंतर पुणे येथील प्रसिद्ध युवा पखावज वादक कृष्णा साळुंके यांच्या पखावज एकल वादनाला सुरुवात झाली. त्यांनी सुरुवातीलाच स्तुती परण सादर करुन मैफिलीवर पकड प्राप्त केली पुणे येथील युवा पखवाजवादक श्री. कृष्णा साळुंके यांच्या दमदार आणि सुरेल पखवाज एकल वादनाने लातूरकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. तालातील विलक्षण पकड, लयकारी, दमदार बोल आणि प्रभावी सादरीकरणातून त्यांनी आपल्या कलाविष्काराची अनोखी छाप उमटवली. वादनातील सौंदर्यशास्त्र कसे असते याचे दर्शन घडवत व आपल्या सादरीकरणातून त्याची उकल करत रसिकांना पखवाज वादनातील एक वेगळीच चमत्कृती दाखवून दिली.
लातूरकर रसिकांसाठी स्वरविलास संगीत दरबार हा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
लातूरकरांनी संगीत मैफिलीला मोठया प्रमाणावर दाद दिली तब्बल साडे तीन चाललेल्या संगीत मैफिलीला मोठया प्रमाणावर दाद दिली.यावेळी मांजरा साखर परिवाराचे आबासाहेब पाटील , अँड प्रविण पाटील हरीराम कुलकर्णी रामदास पवार, पंडित देसाई यांच्या सह मांजरा परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा पंडित शांताराम जिगरी आवर्तन युवा पुरस्कार श्री कृष्णा साळुंके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार स्मृतिचिन्ह व मानपत्र या स्वरूपाचे होते. पंडित शांताराम चिगरी गुरुजींचे पट शिष्य व माजी नगरसेवक श्री. विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार मागील चार वर्षापासून सुरू केला आहे.
या दरबाराच्या यशस्वीतेसाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, नियोजनप्रमुख विशाल जाधव, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, श्री.किरण भावठाणकर, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, शरद होळकर, महेश काकनाळे, केशव जोशी, व्यंकटेश पांचाळ, शंभूदेव केंद्रे, हरीराम कुलकर्णी, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, दत्ता पाटील, सतीश मिरखलकर, डॉ. भदाडे, हेमंत रामढवे,व इतर कार्यकर्ते परिश्रम घेतले.कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. हरिदार्वोतम जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.शशिकांत देशमुख यांनी केले.




