पाशा पटेल यांचे फिनिक्स फाउंडेशन व विनोद लाहोटी यांचे जिओ लाईफ यांच्यात करार
*बांबूला सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न-पाशा पटेल*बांबूचे वनक्षेत्र वाढविण्याचे पुण्याचे काम फिनिक्स फाउंडेशन आणि जिओ लाईफच्या माध्यमातून केले जाणार आहे. शेतकऱ्यांना बांबूची औद्योगिक उपयोगिता दाखविल्याशिवाय तो बांबू शेतीकडे वळणार नाही, तो तिकडे बोलल्याशिवाय वनक्षेत्र वाढणार नाही आणि त्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट-तिप्पट नव्हे पाच पटीने वाढणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या पद्धतीने पर्यावरणपूरक बांबूची जागृती करत आहेत त्याच पद्धतीने केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा हे सहकाराच्या माध्यमातून बांबूला सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करत आहेत, असे पाशा पटेल यांनी या कॉन्फरन्समध्ये 22 राज्यांच्या अधिकाऱ्यांसमोर बोलताना स्पष्ट केले.
*विषमुक्त अन्नासह पर्यावरण वाचविण्याचे कार्य-विनोद लाहोटी*देशातील शेतकरी आणि जनतेला विषमुक्त अन्न खाऊ घालण्यासाठीच जिओ लाईफची स्थापना झालेली आहे. आता पाशा पटेल यांच्या फिनिक्ससोबत काम करताना विषमुक्त अन्न यासोबतच पर्यावरण वाचविण्याचे काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बांबू लागवडीची पर्यावरण पूर्वक चळवळ मूर्तरुपात आणण्यासाठी जिओ लाईफचे सर्वतोपरी योगदान राहील, अशी ग्वाही जिओ लाईफचे मालक विनोद लाहोटी यांनी यावेळी बोलताना दिली.
*लातूर/प्रतिनिधी* –
पर्यावरण अभ्यासक तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते पाशा पटेल यांची लोदगा (जिल्हा लातूर) येथील फिनिक्स फाउंडेशन आणि उद्योजक तथा जिओ लाइफचे मालक विनोद लाहोटी यांच्यात झालेल्या करारानुसार लोदगा येथील प्रयोगशाळेत निर्मित बांबूची रोपे जिओ लाईफच्या माध्यमातून देशातील 22 राज्यात उपलब्ध होणार आहेत. सोबतच फ्रॅंचाईजी, बांबूवर आधारित उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. उपरोक्त कराराच्या अनुषंगाने इंदोर येथे चार दिवसीय कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, तिचा समारोप गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी झाला. त्यात जिओ लाईफ आणि फीनीक्सच्यावतीने संयुक्तरीत्या राबविण्यात येणाऱ्या बांबूवर आधारित प्रकल्पाच्या अजेंड्याचे विमोचन फिनीक्स फाउंडेशनचे अध्यक्ष पाशा पटेल आणि जिओ लाईफचे मालक विनोद लाहोटी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सोपाचे चेअरमन डॉ. देवेश जैन, एईशेर आफ्टर सेलचे व्यवस्थापकीय संचालक अजय गुप्ता, प्रगतशील शेतकरी विनय शर्मा, धुळे येथील शेतकरी संघटनेचे प्रमुख गुलाबसिंह भैय्या यांच्यासह जिओ लाईफचे देशभरातील क्षेत्रीय व्यवस्थापक आणि अनेक डिस्ट्रीब्यूटर उपस्थित होते. जिओ लाईफची उत्पादने विकण्यासाठी देशभर जाळे विणण्यात आलेले असून, त्यासाठी कार्यरत 3000 डिस्ट्रीब्यूटरच्या माध्यमातून लोदगा येथे निर्मित बांबूची रोपे देशातील 22 राज्यात विक्री करण्यात येणार आहेत. सोबतच प्लांटेशन, फार्मिंग फ्रॅंचाईजी आणि बांबूपासून उद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले जाणार आहे. त्या अनुषंगाने या कॉन्फरन्समध्ये पाशा पटेल आणि विनोद लाहोटी यांनी जिओ लाईफच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

संयुक्त पद्धतीने व्यापक प्रमाणात देशपातळीवर राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी 22 राज्यात एमएससी ऍग्री शिक्षण झालेले प्रतिनिधी नेमले जाणार असून, ते आपापल्या भागात बांबू शेती कशी करावी, कोणत्या रोपांची लागवड करावी, कोणती रोपे इंधन, बॉयलर, कापड उद्योग, फर्निचर निर्मिती, औष्णिक वीज प्रकल्प, इथेनॉल निर्मितीसाठी योग्य असतात, याची माहिती देणार आहेत. सोबतच देशभरात लागवड केला जाणारा बांबू खरेदी करण्याची हमी दिली जाणार आहे. बांबूपासून कापड उद्योग देशभरात भरभराटीस आणण्यासाठी या चैनच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे, त्याची रूपरेषाही या कॉन्फरन्समध्ये आखण्यात आली. पाशा पटेल आणि विनोद लाहोटी यांनी क्षेत्रीय व्यवस्थापकांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. पाशा पटेल म्हणाले की, आगामी काळात जिओ लाईफचे जेवढे कर्मचारी आहेत, त्यांना बांबूपासून निर्मित टी-शर्ट फिनिक्स फाउंडेशनतर्फे दिले जाणार आहेत. बांबूपासून फर्निचर निर्मितीची मशिनरी, कापड उद्योगाला बरे दिवस आणण्यासाठी लोदगा येथे मिनी प्रोजेक्ट सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.