विकासापेक्षा भावनेला प्राधान्य – आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिक्रिया
लातूर/ प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने विकासाचा मुद्दा मांडला. याउलट काँग्रेसकडून भावनिक विषयाभोवती निवडणूक फिरवण्यात आली. जनतेचा बुद्धिभेद करत ही निवडणूक झाली. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून यापुढेही सर्व उमेदवार जनसेवेसाठी तत्पर असतील, अशी प्रतिक्रिया निवडणूक प्रमुख माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. निलंगेकर म्हणाले की, भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. प्रचारादरम्यान विकासाची भूमिका मांडली.विकासाच्याच भूमिकेवर आम्ही मतदारांना सामोरे गेलो. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यताही नव्हती.जेंव्हा विजयाची शक्यता नसते तेंव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे तंत्र काँग्रेसने वापरले. जनतेचा बुद्धिभेद केला आणि भावनिक विषयाभोवती निवडणूक फिरवली. प्रचारातही केवळ भावनिक विषय त्यांनी मांडले, असे आ.निलंगेकर म्हणाले.

निकालानंतर जनतेने दिलेला आम्हाला मान्य आहे. मनपाच्या सभागृहात भाजपाचे 22 नगरसेवक असणार आहेत. हे 22 प्रतिनिधी जनहितासाठी,सर्वसामान्य लातूरकरांसाठी काम करतील. जनसेवा आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहतील. मतदारांनी भाजपाला साथ दिली त्याबद्दल सर्व मतदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो, असे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले.




