विनोद चव्हाण यांना नागतिर्थवाडी ग्रामपंचायतचा कार्य गौरव पुरस्कार प्रदान
देवणी ता लातूर –लातूर जिल्ह्यात असलेल्या देवणी तालुक्यातील नागतिर्थवाडी ग्रामपंचायत च्यावतीने लातूर येथील इंग्रजी वर्तमानपत्राचे पत्रकार विनोद चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्य गौरव पुरस्कार देऊन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त गावात नुकत्याच आयोजित कार्यक्रमात विनोद चव्हाण यांना सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य रामचंद्र तिरुके, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार सुरेश घोळवे,उपसभापती प.स.देवणी शंकरराव पाटील तळेगावकार, जिल्हा परिषद समाज कल्याणचे सभापती रोहिदास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विनोद चव्हाण हे गेली अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यात इंग्रजी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्रासाठी पत्रकार म्हणून कार्यरत आहेत त्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक, दिव्यांगांच्या चळवळीमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असून त्यांनी दिव्यांग, सामाजिक समस्या व विविध विषयांवर विपुल असे लेखन केले आहे.

नागतिर्थवाडी हे लातूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील एक गाव असून मराठवाड्यातील पहिले मोफत WiFi इंटरनेट गाव बनले आहे. या विषयावर विनोद चव्हाण यांनी इंग्रजीमध्ये लिखाण केल्यानंतर संपूर्ण देशपर या गावची जोरदार चर्चा होऊन कौतुक झाले. विनोद चव्हाण यांना ग्रामपंचायतीच्या वतीने मिळालेल्या कार्य गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी गावातील माजी सरपंच तुकाराम पाटील.. तुकाराम येलमटे तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे आदीसह गावातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज गुणाले , उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, वर्षाराणी येलमटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले.

विनोद चव्हाण यांना नागतिर्थवाडी ग्रामपंचायत च्यावतीने कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य रामचंद्र तिरुके व इतर ग्रामस्थ.











