महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगाणा, कर्नाटकातील २५० उमदेवारांची नोंदणी
लातूर : वीरशैव लिंगायत समाज, लातूरच्या वतीने आयोजित दुसर्या पुनर्विवाह परिचय मेळावा व पुनर्मिलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या जवळपास २५० उमेदवारांनी यात नोंदणी केली. विशेष म्हणजे काही अविवाहित तरुणांनीही विधवा, घटस्फोटितांशी विवाह करण्यची तयारी दर्शवून नोंदणी केली आहे.
लातूर येथील वीरशैव लिंगायत भवन येथे पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऍड. रजनीताई गिरवलकर तर प्रमुख पाहुणे ब्रम्हकुमारी नंदा बहेन, डॉ. सचिन जाधव होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. प्रभाताई वाडकर, डॉ. वर्षा दरडे, ब्रम्हकुमारी पुण्या बहेनजी, ऍड. उटगे, संयोजक विवेक जाणते, उमाकांत कोरे यांची उपस्थिती होती.अध्यक्षिय भाषणात ऍड. रजनी गिरवलकर यांनी, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एका ठराविक वळणावर जोडीदाराची गरज भासतेच असे सांगतांना आयुष्य म्हणजे तडजोड , तडजोड आणि तडजोडच आहे. अधिकच्या अपेक्षा ठेवल्या नाहीत तर मतभेद आणि मनभेद होणार नाहीत. शारीरिक गरजांपेक्षा मनाच्या गरजा ऊर्जा देणार्या असतात. घटस्फोटासारख्या समस्यांमुळे समाज आणि देश अशक्त होत आहे.
विरशैव लिंगायत समाजाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून या समस्येवर उपाय शोधला जात आहे. ही खरोखरच मोलाची बाब आहे, असे सांगुन कायदेविषयक मार्गदर्शन केले. मानव हा समुहाने राहणारा आहे. म्हणजेच एकत्र राहण्याचे मुल्य त्याला माहिती आहे. याच मुल्यावर आपली कुटुंब व्यवस्था टिकून आहे. मात्र नकारात्मक विचारामुळे आज कुटुंब विभक्त होत असून यातून घटस्फोटासारख्या समस्या निर्माण होत आहे. जोडीदाराला घटस्फोट देण्यापेक्षा मनातील विकारांना, नकारात्मकतेला घटस्फोट दिल्यास अनेक समस्यांचे निराकरण होईल, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी नंदा बहेन यांनी केले. योवळी डॉ. सचिन जाधव यांनी नातेसंबंध, मानवी स्वभाव यावर विचार व्यक्त करताना दुसर्याच्या वागण्याचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या वागण्याचा विचार केल्यास प्रत्येक नातं सुंदर बनेल असे प्रतिपादन केले. ब्रम्हकुमारी पुण्या बहेनजी यांनी आपण संस्कार विसरत असल्यानेच अशा समस्या निर्माण होत असल्याचे अधोरेखित केले तर प्रा. प्रभा वाडकर यांनी घटस्फोटाने केवळ मनावर नाही तर कुटुंब व्यवस्थेवरही घाव होतो. त्यामुळे एकमेकांचा स्वीकार मनापासून केल्यास त्यांच्यातील त्रूटी आपोआप नष्ट होतात असे मत व्यक्त केले.प्रास्ताविकात संयोजक विवेक जाणते यांनी, पुनर्विवाह मेळाव्याची भूमिका विषद करताना समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याची खंत व्यक्त करून यावर पर्याय म्हणून घटस्फोटच होवू नयेत यासाठी पुनर्मिलन अभियान सुरु केले असल्याचे सांगितले.
सुत्रसंचलन रविशंकर कोरे यांनी तर आभार उमाकांत कोरे यांनी मानले. यावेळी पुनर्विवाह सोहळ्यास मदत करणार्या मान्यवरांचा आणि ऍप डेव्हलपर रुपेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यासाठी विश्वनाथ निगुडगे, बालाजी पिंपळे, उदय चौंडे, उमेश कामशेट्टी, मन्मथ बोळेगावे, संदीप इंडे, पंकज कोरे, रविकिरण गळगे, लक्ष्मीकांत मंठाळे आदींनी परिश्रम घेतले.