व्यक्ती विशेष

0
295

हरहुन्नरी चतुरस्त्र रोहन

माझा पुतण्या आमच्या घराण्यातील 3 ऱ्या पिढीचा वारसा जपत आज मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स सारख्या एका नामांकित दैनिकात गेली 10 वर्षे चित्रकार म्हणून आपल्या कलेची सेवा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बजावत आहे. आर के लक्ष्मण यांची व्यंगचित्रे, वैशिठ्ये पूर्ण अग्रलेख आणि विविध आकर्षक पुरवण्यासाठी आम्ही लहानपणी ज्या महाराष्ट्र टाइम्सची दुपारी 3 पर्यंत वाट बघायचो त्या प्रतिष्टीत वृत्तपत्राचा एक घटक होण्याचे भाग्य आपल्या परिवारातील एक सदस्याला लाभल याच वेगळंच अप्रूप आहे. रोहनने पुण्यातील भारती विद्यापीठातून आपले BFA चे शिक्षण पूर्ण केले. कलेतील पुढील उच्च शिक्षणासाठी नंतर त्याने मुंबई गाठली कलेतील पंढरी असलेल्या जे जे स्कुल ऑफ आर्ट मधून त्याने अत्यन्त परिश्रमाने MFA पूर्ण केले.त्याचे कौशल्य आणि कलेतील जाण पाहून लगेच म टा ने स्वतः होऊन निमंत्रित करून रोहनची स्टाफ आर्टिस्ट म्हणून निवड केली.कुठलेही पाठबळ अथवा ओळखीचा वापर न करता त्याने मिळवलेले यश आणि स्तिमित करणारी त्याची कला ही समस्त सोलापूरकरांसाठी कौतुकास्पद आणि अत्यन्त अभिमानास्पद आहे. संस्थेतल्या अधिकार पदावर असलेल्या ज्येष्ठ संपादकाने आपल्या सहकारी मित्राचे मनापासून केलेले कौतुक हे कुठल्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा अत्यन्त मोलाचे वाटते..!

रोहन तू असाच मोठा हो ! सर्व मित्र परिवारातर्फे शुभेच्छा..!

धन्यवाद श्री अशोक पानवलकर सर आपण रोहनच्या केलेल्या कौतुकाबद्दल…!

———————————————————————–

 

चित्रकार रोहन पोरे : हा माणूसच वेगळा !

 – अशोक पानवलकर

(माजी कार्यकारी संपादक महाराष्ट्र टाइम्स)

 

आयुष्यात अनेक वेळा अशी माणसे भेटतात की ती कायमची लक्षात राहतात. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये असताना एक अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती निवृत्त होणार होती. निवृत्तीच्या आसपास त्यांना त्यांचे एक पोर्ट्रेट काढून भेट द्यावे असे ठरले. पोर्ट्रेट कोण काढणार हे वेगळे ठरविण्याचे कारण नव्हते. तो माणूस ‘मटा’कडे आहेच. त्याने ते पोर्ट्रेट काढले. त्या ज्येष्ठ व्यक्तीला ते भेटही देण्यात आले. चित्र अप्रतिम असल्याने त्यांच्यासह सगळ्यांनाच ते आवडले. पोर्ट्रेट इतके हुबेहूब होते की फ्रेममध्ये फोटोच चिकटवला आहे असे वाटावे.

काही दिवसांनी ती व्यक्ती मला टाइम्स इमारतीतच भेटली. ते म्हणाले, ‘खरे सांग. तो माझा फोटो आहे की पोर्ट्रेट ? फोटोच काढून पोर्ट्रेट म्हणून दिला आहे ना ? शेवटी त्यांना सांगितले, ”ते चित्र काढताना मटामधले अनेक सहकारी पाहात होते, ते पोर्ट्रेटच आहे, तुमचा फोटो चिकटवलेला नाही”. या उत्तरावर त्यांचा विश्वास बसला नाही हे माझ्या लक्षात आले. ‘तुम्ही मटा कार्यालयात या, तो तुमचे परत चित्र काढेल, मग तर विश्वास बसेल ना,” असे विचारल्यावर मात्र ते शांत झाले.

त्या व्यक्तीच्या मनात शंका आली हे काही चूक नाही. पोर्ट्रेट काढणारा माणूस म्हणजे रोहन पोरे. तो ज्या वेगाने चित्र काढतो ते पाहून अचंबित व्हायला होते. एके दिवशी त्याने अवघ्या काही तासांत तिघांची चित्रे काढून हातात ठेवली होती. तेव्हा मलाही ते फोटो की पोर्ट्रेट, असा प्रश्न पडला होता. तो मटामध्ये आल्यापासून प्रत्येक दिवाळी अंकाची चित्रे त्याने काढलेली आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी ‘मटा’मध्ये अंकाच्या मध्यभागी प्रसिद्ध होणारा विठ्ठल रखुमाईचे चित्र त्याचेच. हे पॅनोरमा चित्र अनेकजण जपून ठेवतात. घरी फ्रेम करून लावतात. काहीजण तर रेल्वे डब्यात हे चित्र लावून विठ्ठल रखुमाईची पूजा करतातरोहन स्वभावाने अत्यंत शांत आहे. पण चित्र काढताना त्याचा हात ज्या वेगाने चालतो ते प्रत्यक्ष पाहण्यासारखे आहे. नमुन्यादाखल त्याची काही चित्रे इथे देत आहे. आजच मटामध्ये काढलेले विठ्ठल रखुमाईचे चित्र सुरुवातीलाच दिले आहे. रोहन वर्तमानपत्रात काम करतो. चित्र काढायला सांगितल्यावर , उद्या-परवा देतो ‘ असे म्हणता येत नाही. लगेच चित्र काढून द्यावे लागते. त्यामुळे कामात वेग आणि अचूकता दोन्ही असावी लागते. ते गुण त्याच्याकडे आहेत. सांगितलेली चित्रे काढणे हे काम तो करतोच, पण एखाद्या विषयावर (उदा. अर्थसंकल्प आणि तशासारखे विशेष दिवस) स्वतः विचार करून समर्पक चित्र तो काढतो.रोहनसारखे कलाकार विरळाच. पोर्ट्रेट काढणे ही कला आहे, सगळ्यांना ती जमत नाही. त्याची व माझी पहिली भेट झाली तेव्हा त्याचे काम पहिले. मग मटासाठी निवड ही फक्त औपचारिकता उरली होती. ”मी याआधी कुठेही नोकरी केली नाही, त्यामुळे इथे कसा राहीन माहीत नाही,” असे मला म्हणणारा रोहन नुसताच राहिला नाही, तर स्थिरावला. स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून राहिला. रोहनला पुढील अनेक चित्रांसाठी शुभेच्छा. त्याची कला अशीच बहरात जावो या सदिच्छा !.

(श्री अशोक पानवलकर हे गेली चार दशके पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला काही महिने ‘समाचार भारती ‘ आणि नंतर ३७ वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स ‘ असा प्रवास आहे. नुकतेच मटामधून कार्यकारी संपादक म्हणून निवृत्त झाले आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here