डॉ. राजन वेळूकर.
वेळूकरसरांची आणि माझी ओळख वरळीच्या शासकीय वसाहतीत झाली. मला ‘दर्शना’मध्ये घर मिळाले होते. आणि शेजारच्या ‘शीतल’ या इमारतातीत सर राहत होते. एका संध्याकाळी सहज फिरताना भेट झाली. माझे पती श्रीनिवास यांची आणि सरांची आधीच ओळख होती. उंच सडपातळ बांधा, दाट केस, खादीचे स्टार्च केलेले शर्टपँट, चष्म्यातून डोकावणारी शांत पण तीक्ष्ण नजर आणि चेह-यावर अत्यंत विनयशील भाव हे माझ्या आजही लक्षात आहे.
पहिल्या संभाषणातून माझ्या लक्षात राहिला तो त्यांचा विलक्षण साधेपणा आणि संयमी स्वरात आपला मुद्दा ठामपणे सांगण्याची लकब. त्यावेळी ते मंत्री कार्यालयात ‘विशेष कार्य अधिकारी’ होते. मीही त्यावेळी मंत्रालयात होते. तेंव्हा क्वचित भेटीगाठी होत असत. त्यांच्या पत्नी सौ. गीतावाहिनी या अत्यंत बोलक्या आणि मोकळ्या स्वभावाच्या होत्या त्यामुळे आमच्यात कौटुंबिक मैत्रीही लवकर झाली. मग सर ‘राजभवन’मध्ये उपसचिव म्हणून गेले. खरे तर ‘राजभवन’मध्ये काम मिळाल्यावर की ती पोस्टिंग कशी नियमित होईल ते बघण्याकडे ब-याचा अधिका-यांचा कल असतो. पण सर मात्र वर्षभरातच ‘सार्क’ देशांच्या चंदिगढ येथील आंतरराष्ट्रीय युवा केंद्रात गेले. त्यावेळी त्यांचा विविध देशातील लोकांशी संपर्क आला व शिक्षण पद्दतीतील अनेक नवे उपक्रम त्यांनी आत्मसात केले. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या नव्या प्रवाहांशी त्यांची ओळख झाली.
एकदा आम्ही चंदिगढला सहलीसाठी गेलो असता गावापासून बरेच दूर असणा-या आमच्या हॉटेलमध्ये सर आणि वाहिनी आम्हाला भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक अनुभव सांगितले. या सर्व ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कसा होईल हा ध्यास त्यांच्या सगळ्या बोलण्यातून दिसून येत होता.
एक दिवस अचानक नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वेळूकरसर झाल्याची बातमी आली आणि आम्हाला खूप आनंद झाला. कारण श्रीनिवास त्या विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी होता. मुक्त शिक्षणपद्धतीचा सरांनी सखोल अभ्यास केल्याचे त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून जाणवत होते. या व्यवस्थेला वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यानी अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु केले. त्यात जसे अगदी कमी शिकलेल्या लोकांसाठी असलेले शिक्षणक्रम होते तसेच संगणकातील अद्ययावत शिक्षण देणारेही शिक्षणक्रम होते. त्यामुळे विद्यापीठ ख-या अर्थाने सर्वसामन्यापर्यंत पोहोचले. जेंव्हा सर विद्यापीठात आले तेंव्हा विद्यार्थीसंख्या १ लाख होती ती त्यांनी तिप्पटीने वाढवली. त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमात फुलपाखरू उद्यान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे वसतिगृह, फळबाग लागवड, संगणकशास्त्रातील अल्पमुदतीचे अभ्यासक्रम असा विद्यापीठाची सर्वांगीण प्रगती साधणारा विचार होता.
विद्यापीठाचे मुख्यालय नाशिकला असले तरी त्याची विभागीय कार्यालये राज्यभरात पसरलेली होती. सर्व काही अत्याधुनिक दर्जाचेच असावे असा आग्रह असलेल्या वेळूकरसरांनी मग विभागीय केंद्राच्या कामकाजाचे वेगवान संगणकीकरण करून ती मुख्यालयाशी जोडली. या काळातच त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. विद्यापीठाचा वाढता पसारा, अनेकवर्षे प्रलंबित पडलेले प्रश्न, घरच्या फ्रंटवर सौ. गीतावहिंनींचे आजारपण आणि त्यातच त्यांचे चटका लावून गेलेले निधन, या संपूर्ण कालावधीत सरांचा शांत राहून प्रश्नाला तोंड देण्याचा स्वभाव फार उठून दिसत होता.
आम्ही अधूनमधून सौ. वहिनीना भेटायला जात असू. त्यावेळी सर आणि त्यांची मुलगी जान्हवी दोघे मन लावून वहिनींची सुश्रुषा करताना दिसत. वहिनीची तब्येत रोज खालीवर होत होती. फार अवघड काळ होता. शेवटी त्यांचा अकाली निधनानंतर एवढे मोठे दु:ख पदरात येऊनही त्यांनी स्वत:वरचा संयम ढळू दिला नाही. समतोल वृत्ती राखली. उलट सरांनी भेटायला येणा-यांची विचारपूस केली. वहिनीच्या आईंचा सांभाळ सरांनीच केला आहे. त्यांचे वय सध्या ९२ आहे. त्या नेहमी सरांकडेच असतात. मुलीच्या निधनानंतर त्या फार हवालदिल झाल्या होत्या. त्यांची समजूत काढताना सर जान्हवीला समोर उभे करून म्हणाले होते, “आई, ही बघा तुमची मुलगी! ही तर तुमच्या समोरच आहे ना!”
मी राजपत्रित महिला अधिका-यांच्या संघटनेचे काम करत होते. आम्हाला महिला अधिका-यांचे एक संमेलन घ्यायचे होते म्हणून मी सरांना फोन केला आणि विद्यापीठाच्या वसतिगृहात ते घेता येईल का असे विचारले. सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता फक्त एवढेच विचारले, ‘संमेलन किती दिवसांचे असेल? आणि किती लोक येतील?’ मी म्हटले, ‘सर, साधारण ३००/४०० लोक येतील आणि संमेलन २ दिवस चालेल.’ त्यांनी क्षणार्धात होकार देवून आम्हाला सर्वतोपरी मदत केली. त्यावेळी भाषण करताना ते गंमतीने म्हणाले होते, “आताच महिलांना पुरेशी मोकळीक मिळत नाही असे सांगितले गेले, आमच्या विद्यापीठात मात्र तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता. इथे स्वच्छ सुंदर ताजी हवा आहे. त्याचे काही आम्ही बिल लावत नाही!” दोन दिवसाचे ते अधिवेशन अविस्मरणीय झाले. जणू काही आम्ही विध्यापिठाचे पाहुणे आहोत अशी आमची सरबराई झाली!
नंतर सर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. इतर सर्व विद्यापीठांप्रमाणे तिथेही प्रचंड राजकारण होते. हितसंबधी लोकांनी कारस्थानाचा नवा नीचांक प्रस्थापित करत प्रसारमाध्यमातून त्यांच्यावर व्यक्तिगत टीकेचे वादळ उठवले. त्याकडे दुर्लक्ष करून सर शांतपणे काम करत राहिले. याकाळात त्यांनी विद्यापीठात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था उभ्या केल्या आणि त्यासाठी त्याच दर्जाच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण केले. ‘वर्ल्ड सायन्स काँग्रेस’ ही प्रतिष्ठित परिषद आयोजित केली. तिचाही स्तर त्यांनी नव्या उंचीवर नेला कारण त्यासाठी जगभरातून १५ नोबेल पारितोषिकप्राप्त विद्वानाचा सहभाग मिळवला. यापूर्वीच्या इतिहासात कधीही इतक्या संख्येने नोबेलविजेते शास्त्रज्ञ या कार्यक्रमाला आलेले नव्हते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान आले. सरांच्या धीरगंभीर स्वभावामुळे हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. त्यांच्या काळात ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ विभाग सुरु केला गेला. विद्यापीठाचा दूरशिक्षणविभाग अधिक कार्यक्षम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम तंत्रज्ञानाचा वापर तेंव्हाच सुरु केला होता.
विद्यापीठे समाजात घडणा-या सर्व घटनांबद्दल संवेदनशील असतातच असे नाही. मात्र डॉ.वेळूकर जिथे जिथे गेले त्या संस्थात त्यांनी ही संवेदनशीलता पसरवण्याचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठात ते कुलगुरू असताना दिल्लीत निर्भया कांड घडले. सगळा देश त्या घटनेने हादरला होता. यावर खरे तर विद्यापीठाना काही करणे शक्य नव्हते. मात्र हा प्रसंग इतिहासात केवळ एक भयंकर गुन्हा म्हणून नोंदवला जावून विसरला जावू नये असे सरांचे मत होते. या गंभीर विषयावरचे समाजाचे चिंतन एक दस्ताऐवज म्हणून पुढील काळातही उपलब्ध रहावा म्हणून सरांनी विविध संपादक, लेखक, विचारवंत, स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या अशा सर्वांचे या विषयावरील लेख संपादित करून त्याचा एक ग्रंथ प्रकाशित केला.
सरांवर गाधी विचारसरणीचा फार प्रभाव आहे. ते नेहमी कपडेही खादिचेच घालतात.गांधीजींची १५०वी जयंती हा गांधीविचारला पुन्हा भेट देण्याचा प्रसंग मानून त्यांनी गांधी-१५० नावाचा एक सखोल चिंतनग्रंथ गांधी विचाराच्या अनेक तज्ज्ञांना बरोबर घेऊन प्रकाशित केला.
काही हितसंबंधी गटतट आणि माध्यमे त्यांच्यावर नाराज असली तरी विद्यापीठातील अधिकारी ,कर्मचारी आणि विद्यार्थी मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर खुश होते. ते सेवानिवृत्त झाले तेंव्हा सर्व संघटनांनी त्यांचा केलेला हृद्य निरोपसमारंभ लक्षणीय होता.
मुंबई विद्यापीठातून ते सोमैया महाविद्यालात गेले. मध्य प्रदेशातील ‘रायसोनी विद्यापीठातही’ त्यांनी कुलगुरू म्हणून काम केले आणि आता ते सुरतच्या एका विद्यापीठात कुलगुरू आहेत.
वेळूकरसरांचा इतका सारा प्रवास पाहताना माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की इतकी मोठी पदे मिळूनही सरांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्यांनी कधी त्या गोष्टीचा गर्व केला नाही किंवा मोठेपणा मिरवला नाही. मंत्रालयात ते जेव्हा एखाद्या सचीवाला किंवा मंत्री महोदयाना भेटायला येतात त्यावेळी तिथे असणा-या शिपाया पासून ते सर्वाची आस्थेने चौकशी करतात. आमच्या घरासाठी तर ते नेहमीच घरातील एखाद्या वडीलधा-या व्यक्तीसारखे रहात आले आहेत. आमच्या कुठल्याही छोट्यामोठ्या गोष्टीसाठी आम्ही बिनधास्त सरांना फोन करून त्रास देतो. सरही प्रश्न शांतपणे समजून घेऊन तटस्थपणे मदत करतात. एकदा मी त्यांच्याकडे माझ्या ओळखीच्या मुलीला घेऊन गेले. तिला परदेशी शिक्षणासाठी जायचे होते. तिला काय करावे, कोणता शिक्षणक्रम निवडावा यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवे होते. सर त्यावेळी मुंबईचे कुलगुरू होते. त्यांच्या अतिशय व्यस्त दिनक्रमात त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्या मुलीशी ते सविस्तर बोलले. आज ती मुलगी वल्ड बँकेत अधिकारी म्हणून काम करते आहे. असे कितीतरी अनुभव सांगता येतील.
मला सर्वात जय बाबीचे आश्चर्य वाटते ते हे कि व्यक्तिगत आयुष्यात इतकी दुख भोगल्यावरही हा माणूस इतका शांत आणि समतोल कसा राहू शकतो. कदाचित या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृतापत्राला दिलेल्या मुलाखतीत असेल. तुम्ही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणत्या बाबतीत यशस्वी झालात आणि कोणत्या गोष्टी अपूर्ण राहिल्या याचे अत्यंत प्रांजळ आणि प्रामाणिक उत्तर दिल्यावर ते त्या वार्ताहराला म्हणाले होते. “I was focused, and therefore I was not bothered.
*******

लेखन –श्रद्धा बेलसरे-खारकर
८८८८९५९०००











