स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवारी
‘ पं.नेहरू समजून घेताना. .’ व्याख्यानाचे आयोजन
लातूर : स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवार, दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात प्रा. डॉ. न.गो. राजूरकर यांचे ‘पं.नेहरू समजून घेताना. .’ ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक, राज्यशास्त्राचे संशोधक, उस्मानिया विद्यापीठाचे सन्मानित प्रा. डॉ. न.गो.राजूरकर यांनी हैदराबादमध्ये राहून त्यांनी मराठी व इंग्रजी विचारविश्वात मोलाची भर घातली आहे. त्यांना ‘महात्मा गांधी पुरस्कार हा राष्ट्रीय सन्मान बहाल करून त्यांच्या त्यांची संशोधनवृत्ती, तर्कशुद्ध मांडणी आणि वाङ्मयसेवा यांचा गौरव करण्यात आला आहे.

मराठी,हिंदी,इंग्रजी, उर्दू व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या डॉ. राजूरकर यांची उर्दूमध्ये दोन,इंग्रजीतून पाच तर मराठीत आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ज्येष्ठ विचारवंत दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्यासह डॉ राजूरकर यांनी लिहिलेला ‘ पंडित नेहरू एक मागोवा’ हा ग्रंथ एक महत्त्वपूर्ण ऐवज आहे. पं.नेहरू यांची प्रतिमा स्वप्नाळू आणि कविमनाचा राजकारणी, अशी रंगविण्यात येते; परंतु त्यांच्या राजकारणाला कठोर वास्तवाचे अधिष्ठान होते, हे मराठीजनांना या पुस्तकातून सर्वप्रथम समजले.
डॉ. राजूरकर यांनी भारताची स्वातंत्र्य चळवळ, आधुनिक भारताची घडण, गांधीजीं, डॉ. बाबासाहेबआंबेडकर व नेहरू यांचे योगदान ह्या विषयांवर सखोल संशोधन केले आहे. तसेच पं. नेहरूंशी अनेक वेळा चर्चा करून त्यांच्या धोरणांवर डॉक्टरेट मिळवली आहे. त्यामुळे त्यांना, संसद सदस्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेहरू यांच्या कार्याचे विश्लेषण करणारी व्याख्याने देण्यास आमंत्रित केले होते. त्यांनी ह्याच विषयांवर अमेरिकतील अनेक विद्यापीठांना संबोधित केले आहे.
डॉ. राजूरकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ आंध्रप्रदेश सरकारने असामान्य गुरुवर्य, तर पंजाब विद्यापीठाने डि.लीट. बहाल केली आहे. तर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ‘बिंब-प्रतिबिंब’ पुस्तकाला वि.रा. शिंदे पुरस्कार दिलेला आहे. भाक्रा नांगल, भिलाई पोलाद उद्योग, आय.आय.टी, आय.आय.एम, एम्स, एन.आय.डी. व साहित्य अकादमी अशा बहुविध क्षेत्रांमधील ७५ संस्थांची स्थापना करून भारतीय विकासाचा पाया रचणाऱ्या पं. नेहरू यांचे विचार व कार्य समजावून सांगण्यासाठी ९३ वर्षे वयाचे वयोवृद्ध तपस्वी लातुरात येत आहेत. या व्याख्यानास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून समाजशिक्षक डॉ.राजूरकर यांचे विचार ऐकावेत अशी विनंती ‘स्वामी रामानंदतीर्थ’ व्याख्यानमालेच्या वतीने श्रीनिवास लाहोटी , सुमती जगताप, डॉ.अजित जगताप व अतुल देऊळगावकर यांनी केली आहे.

——————–




