इचलकरंजी ; दि.१४ ( प्रतिनिधी )—
येथील विविध भागांत महापालिकेचे कर्मचारी कचरा आणून टाकत असल्याने पुन्हा कोंडाळे निर्माण होत आहेत. त्यातच कचरा उठावही नियमित होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, प्लास्टिक कचरा कोठून येतो, याचा शोध घ्यावा. कोंडाळ्यात कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, शहर कोंडाळेमुक्त करावेत, अशी मागणी व्हिजन इचलकरंजीने महापालिककडे निवेदनाद्वारे केली आहे. उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी निवेदन स्वीकारले.

येथील मुख्य रस्त्यावरील वृषाली ट्रॅव्हल्सच्या मागील बाजूस रिकामी जागा आहे. या जागेवर महानगरपालिकेचे कर्मचारी बाहेरचा कचरा गोळा करून तिथे एकत्रित करतात. मात्र, कचरा उठाव करणारी गाडीही तीन ते चार दिवसातून एकदा येते. त्यामुळे उठाव वेळोवेळी न झाल्याने तो कचरा कुजतो. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी प्लास्टिक जाळण्याचे प्रकारही घडत असल्याने वातावरण प्रदूषित होत आहे. असे प्रकार शहराच्या अनेक परिसरात होत असल्याने स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागत आहे.

त्यामुळे शहरातील कोंडाळे बंद करावीत, दोषींवर कारवाई करावी, प्लास्टिक कचरा कोठून गोळा होत आहे, त्याचा शोध घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी कौशिक मराठे, महेश ओझा, मुकेश दायमा, विशाल माळी, राजेश व्यास, अमित कुंभार, अनिल सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.




