पावसात खंड पडल्याने आमदार धिरज देशमुख यांची मागणी; काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
—
लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यात जवळपास महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
पावसाने पाठ फिरवल्याने लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या परिस्थितीची त्वरित दखल घेवून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांना लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी निवेदन दिले.
यावेळी लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रवीण पाटील, एकनाथ पाटील, रमेश सुर्यवंशी, लक्ष्मण मोरे, अजय मार्डिकर, कैलास कांबळे, करीम तांबोळी, आसिफ बागवान, दत्तात्रेय पाटील, काशिनाथ वाघमारे, अंगदराव गायकवाड, संदीपान सुर्यवंशी, नरेश पवार, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, खाजाभाई शेख, तबरेज तांबोळी, अशोक सुर्यवंशी, सिद्धेश्वर जळकोटे, प्रवीण कांबळे, पंकज सोनवणे, ज्ञानोबा गवळे, प्रवीण कांबळे, वैभव त्रिभुवन, बब्रुवान गायकवाड, फारुख शेख, शीतल मोरे, प्रमोद जोशी, सुलेखा कारेपुरकर, सुनील पडिले, देविदास बोरुळे पाटील, पद्माकर वाघमारे आदी उपस्थित होते.
शेतकरी पीकविमा भरपाई मिळण्यास पात्र :
जून महिन्यात पाऊस नसल्याने पेरण्यांना उशीर झाला. जुलै महिन्यातही दोनच आठवडे पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याचेही सुरवातीचे दोन आठवडे कोरडे गेले. त्यामुळे पिके माना टाकत आहेत. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसात सलग खंड पडल्यानंतर शेतकरी पीक विमा भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.
शासनाने त्वरित दखल घ्यावी :
शेतकरी बांधवांवर सातत्याने संकटे कोसळत आहेत. आधी शंखी गोगलगाय, पैसा आळी व इतर कीटकांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, वन्य प्राण्यांकडूनही मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होत आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे. या गंभीर परिस्थितीची शासनाने त्वरित दखल घ्यावी, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.




