श्रद्धांजली

0
241

प्रतिभावान नि प्रगल्भ संपादक 

 

सुभाषचंद्र वाघोलीकर यांचे दु:खद निधन 

 

मराठवाड्यातील अतिशय प्रतिभावान , प्रगल्भ नि चिंतनशील व व्यासंगी संपादक सुभाषचंद्र वाघोलीकर यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने ( cardiac arrest ) दु:खद निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. अतिशय प्रामाणिक नि धारदार नि शैलीदार लेखणीचे धनी वाघोलीकर यांनी आपली पत्रकारिता नाशिकच्या दै. गावकरीमध्ये सुरू केली. दै. मराठवाडाचे थोर संपादक अनंत भालेराव यांच्या लढाऊ दैनिकाशी वैचारिक नाळ जुळत असल्यानं ते दै. मराठवाडामध्ये आले नि धारदार लेखनशैलीनं वाचकांमध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण करू शकले. विविध विषयांवरचं गंभीर व विपूल वाचन हे त्यांचे वेगळेपण होते. ते लेखनातही प्रतिबिंबित व्हायचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आमच्या तासंतास गप्पांचे प्रसंग मला आठवताहेत. आपली मतं परखडपणे ते मांडीत, पण जातीपातीधर्माचा पूर्वग्रह नि फालतूचा अहंकार कधीच नव्हता. दै. लोकमतमध्येही त्यांनी उत्तम कामगिरी केली. आपल्या कामात सदैव मग्न असणारे वाघोलीकर मोजक्यांकडेच आपलं मन मोकळं करीत असत.त्यातील मी एक होतो. मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यावर त्यांना मन:पूत आनंद झाला होता. व त्यांनी दै. लोकमतच्या सर्व आवृत्तीत माझ्यावर एक नितांत मनोज्ञ लेख लिहिला होता, हेही मला चांगलं आठवतयं.कधीही उथळमाथळ बोलणं न करणारे नि लिहिणं नसणारे , मात्र आपल्या ख़ास धारदार कमावलेल्या वाघोलीकर शैलीत लिहिणारे नि बोलणारे गंभीर प्रकृतीचे प्रगल्भ संपादक आज विरळ होत असताना वाघोलीकर यांची अचानक एक्झीट मनाला चटका लावणारी आहे.आदरांजली ..!

सुधीर गव्हाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here