प्रबोधतून समाजापरिवर्तन अग्रणी संघटना : मराठा सेवा संघ
निलंगा,—( प्रशांत साळुंके )— 1 सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा स्थापना दिवस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो.यावर्षी मराठा सेवा संघाचा 31 वा वर्धापन दिवसांचे औचित्य साधून निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी सभागृृहात मराठा सेवा संघाचे सामाजिक सांस्कृतिक योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.एम.जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश जाधव,गटविकास अधिकारी अमोल ताकभाते होते.प्रमुख पाहुणे म्हणून शुभेच्छापर मनोगतात अमोल ताकभाते बोलताना म्हणाले, मराठा सेवा संघ ही सर्व अठरापगड जातीतील समाजबांधवांना एकञ घेऊन जाणारी वैचारिक चळवळ आहे.या चळवळीत महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचाराचे साम्य दिसते म्हणून या संघटनेच्या मागे समाज उभा असल्याचे मत व्यक्त केले.
अतिथी तहसीलदार गणेश जाधव यांनी सेवा संघाच्या वैचारिक चळवळीचा मी एक सदस्य असल्याचे सांगून मराठा बहुजन समाजातील शेतीच्या वादातून भांडणे पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी ती बंद झालेली नाहीत ही खंत व्यक्त करून संघाच्या न्याय कक्षाने यात अपिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली कारण शेतीच्या वादातून होत असलेले तंटे आपापसात सामंजस्याने मिटले तर अनेक कुटुंब सुखी जीवन जगतील हे प्रशासनातील आपल्या अनुभवावरून सांगितले.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा निलंगा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डाॅ.हंसराज भोसले यांनी मागील 30 वर्षातील मराठा सेवा संघाचे सामाजिक सांस्कृृतिक योगदान या विषयावर सविस्तर आणि नेमकेपणाने मार्गदर्शन करताना सेवा संघाच्या निर्मितीपूर्वीचा महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृृृतिक संघर्ष बाराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत संतांच्या चळवळीपासून ते महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ डाॅ.बाबासाहेबांच्या बौध्द धर्म महाराज,श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या मानवतावादी,समतावादी संविधानवादी विचारामुळे झालेल्या समाज जागृृतीचा आणि संघर्षाचा इतिहास सांगून 1 सप्टेबर 1990 ला मराठा सेवा संघाची निर्मिती जागतिकीकरणाच्या प्रारंभ काळात कशी झाली याची वस्तूनिष्ठ मांडणी केली.मागील 30 वर्षात सेवा संघाने 21 व्या शतकात शिवधर्माचा म्हणजे मूळ सिंधू विचाराच्या धर्माच्या समाजाला दिलेला पर्याय ही सांस्कृतिक उपलब्धी असल्याचे सांगितले.
सेवा संघाने प्रबोधनातून परिवर्तन हे कृृृती कार्यक्रम आपल्या 32 कक्षाच्या माध्यमातून राबविला व महाराष्ट्रासह सेवा संघ देश-विदेशात पोहोचविला.भविष्यात सेवा संघाला वैचारिक लठाई ही अशीच लढावी लागणार आहे.झालेल्या चुका दूरूस्त करून आत्मचिंतन करून समाजाच्या प्रगतीसाठी,विकासासाठी,रोजगार बेकारी,आरोग्य,शिक्षण,संशोधन,तंञज्ञान विज्ञान या क्षेञात भरीव कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,उपाध्यक्ष उत्तम शेळके यांनी केले.सूञसंचालन गणेश गायकवाड यांनी केले तर आभार सचिव आर.के.नेलवाडे यांनी मानले.