Homeसांस्कृतिक*डॉ. मिलिंद पोतदारांच्या अभिनयाने भारावले पानगांवकर...!*

*डॉ. मिलिंद पोतदारांच्या अभिनयाने भारावले पानगांवकर…!*

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचा ५ वा स्मृतीदिन गाजला :

डॉ. मिलिंद पोतदारांच्या अभिनयाने झाले पानगावकर मंत्रमुग्ध

भावभावनांच्या आणि कर्तव्यावगुंठित व्यवहारांच्या हुंकारांचे शाप भोगत माणूस प्रपंच करत जगत राहतो. हे द्वंद्व आणि त्यातून जीवनतत्वाचा शोध ‘आनंद ओवरी’ ह्या दि. बा. मोकाशीलिखित कादंबरीच्या अतुल पेठेनिर्मित नाट्यरूपातून स्पष्ट होतो. प्रापंचिक जीवन जगता जगता ‘तुका असा का झाला ?’ याचे उत्तर नाट्यानुभव घेणाऱ्या रसिक प्रेक्षकाला दिसू लागते. साक्षात तुकारामाच्या भावाच्या – कान्होबाच्या – तोंडून भक्तीची व्यथा आणि व्यथेची सखोलता सांसारिक प्रांजळतेसह थेट भगवंतरुपालाच प्रश्न करते. ज्याच्या गाथांनी विश्व गाजवले, त्याच्या प्रपंचाची कथा आणि व्यथा कान्होबाच्या हुंकारांत सापडते. ‘का असा आमच्या संसारात व्यत्यय आणतो आहेस?’ हा तुकाविरहाने व्याकुळ करणाऱ्या लाडिक व्यथेचा प्रश्न कुणा नास्तिकाचा नव्हे, तर त्याच्यावर तुकारामाइतकीच भक्ती असणाऱ्या, तुकारामावरही तेवढीच भक्ती असणाऱ्या कान्होबाचा. हृदय पिळवटून टाकणाऱ्या ह्या प्रश्नाने पानगावकरांना अक्षरशः अंतर्मुख व मंत्रमुग्ध केले.

अंगावर रोमांच उभे करणारा हा नाट्यप्रयोग ‘नाट्यस्पंदन प्रतिष्ठान’ या नाट्यसंस्थेने पानगाव ता. रेणापूर जि. लातूर येथे दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त साकार केला. हा एकपात्री प्रयोग सादर केला लातूरच्या प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी. त्यांच्या अभिनयाने व स्वरवैविध्याने (व्हॉइस मोड्यूलेशन) त्यांनी पानगावकरांना अक्षरशः भारावून टाकले. श्रुतिकांत ठाकूर यांच्या समर्थ दिग्दर्शनाचा स्पर्श नाटकभर जाणवतो. एक सकस, सरस आणि सज्जड नाट्यानुभव देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. संजय अयाचित यांच्या प्रकाशयोजनेच्या व दयानंद सरपाळे यांच्या संगीतयोजनेच्या रंग-सूर-जुगलबंदीने प्रेक्षक त्यात रंगून दंगून गेले. रंगमंच व्यवस्था डॉ. गणेश पोतदार, नंदकिशोर वाकडे, नूर महंमद यांच्यासह बळवंत देशपांडे (अंबाजोगाई) यांनी चोख सांभाळली. 

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या या आयोजनात ग्रामपंचायत (पानगाव) व विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवल विश्वस्त समितीने साह्यभूत पुढाकार घेतला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ‘नाट्यस्पंदन’चे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, सचिव डॉ. मुकुंद भिसे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. चंद्रकांत शिरोळे, डॉ. व्यंकट येलाले यांच्यासह पानगावच्या सरपंच सौ.गयाबाई कस्पटे, उपसरपंच मा. श्री. शिवाजी आचार्य, देवल समितीचे चंद्रकांत आरडले, श्री. चंद्रचूड चव्हाण, माजी सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविस्तार अधिकारी गोपीनाथ टकले, सामाजिक कार्यकर्ते संतोष नागरगोजे, ईश्वर गुडे, दत्तात्रय भंडारे, गणेश वांगे, उत्तरेश्वर हालकुडे, गोविंद दुड्डे, सिध्देश्वर व्यवहारे, रवि उरगुंडे, गणेश वांगे, सुरेंद्र हरिदास, अभिजीत चव्हाण, कृष्णा चव्हाण, जगन्नाथ राचुरे, मुरलीधर डोणे, खरोळा येथील सोमनाथ दवणे व त्यांचा कलावंत संच उपस्थित होते. पानगाव, खरोळा व परिसरातील सर्व ग्रामस्थ, नागरिक यांनी या मोफत नाट्यकृतीचा लाभ घेतला. पानगावच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रयोगाने वातावरण भारावून गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments