भारतीय चिंतन आणि परंपरेचा प्रकाश जगभर पसरणार
रामेश्वर येथील ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ’ भवनातील पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. वि. दा. कराड
लातूर, दि. १३ – जगाला शांतीची, मानवतेची आणि कल्याणाची दिशा दाखवणारे केंद्र म्हणजे विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन ठरेल. या मानवतातीर्थ भवनातून भारतीय चिंतन आणि परंपरेचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचणार, असा विश्वास विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि मानवता तीर्थ रामेश्वर (रुई) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड बोलत होते.
यावेळी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “मानवता भवनमध्ये सत्य, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मानवी इतिहासातील उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्त्वांची चैतन्यदायी प्रतीके आहेत. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे मानवोद्धारासाठी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारताचे खरे रूप रामेश्वर येथे साकार होताना दिसत आहे.””विश्वात सुरू झालेल्या संघर्षाच्या वातावरणात मानव भयभीत झाला आहे. अशा वेळेस मानवधर्मा संदर्भात विचार करतांना एकात्मता, विज्ञान आणि अध्यात्माचा सारांश या सर्वांचा मेळ म्हणजेच मानवता. सर्व धर्मांचा गाभा हा मानवतेचा आहे. येथूनच सात्विकतेचा आणि अहिंसेचा विचार विश्वाला तारणारा आहे. या वास्तूत मानवधर्माचे तीर्थ क्षेत्र दिसून येत आहे. असेही डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.

“प्रा. ज्योती कराड ढाकणे म्हणाल्या, “जगाला एका सूत्रात बांधून ठेवायचे असेल तर मानवताच एकमेव आधार आहे. मानवतेशिवाय कोणताही देश जिवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आज रामेश्वर (रुई) येथे विश्वनाथांच्या रूपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे, जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.””मानवता तीर्थ ही फक्त वास्तू नाही तर एक संदेश आहे. जग पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या मोठ्या विनाशाच्या दिशेने जात आहे. अशा वेळेस या भावनातून दिला जाणारा संदेश मानव जातीला तारू शकतो.” असेही प्रा. ज्योती कराड ढाकणे यांनी बोलून दाखविले. शेवटी डॉ. हनुमंत कराड यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त केले.यावेळी पत्रकार परिषदेत माईर्स एमआयटीचे विश्वस्त ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी ह.भ.प. काशीराम दा. कराड आणि श्री. बालासाहेब कराड उपस्थित होते.







