Homeआरोग्य वार्तामोफत आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-डॉ. ओमप्रकाश शेटे

मोफत आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-डॉ. ओमप्रकाश शेटे

*लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून मोफत आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी-डॉ. ओमप्रकाश शेटे*

लातूर, दि. २५ : जिल्ह्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध होण्यासाठी एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. एकही पात्र व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले.

एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

दुष्काळाच्या संकट काळात गरजू रुग्णांना मोफत आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना उपयुक्त ठरणार आहेत. जिल्ह्यातील ५० खासगी आणि ६६ शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून या योजनांचा लाभ दिला जात असून यामाध्यमातून प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आहेत. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सुमारे ४.५ लाख रुपये दिले जातात.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयात प्रत्येक पात्र रुग्णाला सेवा मिळत असल्याची खात्री करावी. याबाबत काही तक्रारी असतील तर त्याचा निपटारा तातडीने करावा. यासाठी जिल्हास्तरीय समितीने याबाबत पुढाकार घ्यावा, असे डॉ. शेटे म्हणाले.एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेत शासकीय रुग्णालयांची कामगिरी चांगली आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामगिरी सर्वोत्तम आहे, त्या संस्थांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. आयुष्मान कार्ड नोंदणी आणि वयोवंदना कार्ड नोंदणीत चांगली प्रगती आहे. नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात या कामावर आणखी भर द्यावा, असे डॉ. शेटे यांनी यावेळी सांगितले.

अंगीकृत रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही यावेळी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांनी एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments