अधिकारी, कर्मचारी यांनी गावनिहाय दौरा करून
वीज ग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात
रेणापूर येथील वीज ग्राहकाच्या बैठकीत आ. रमेशअप्पा कराड यांची सुचना
लातूर दि.३१– शेतक-याकडे पाणी आहे परंतू वीजे अभावी शेतीला पाणी देता येत नाही. अनेक ठिकाणच्या सार्वजनिक पाणीपुरवठयातील त्रुटी त्याचबरोबर वीज ग्राहकाच्या वैयक्तीक समस्य रेणापूर तालुक्यात दिसून येत असल्याने वीज महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी गावनिहाय दौरा करून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकाच्या अडीअडचणी, समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी सुचना विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिल्या.
रेणापूर तालुक्यातील शेतकर्यांसह सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या समस्या संदर्भात वीज ग्राहक आणि आधिकारी यांची बैठक मंगळवारी आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणापूर येथील महावितरण कार्यालयात झाली. या बैठकीस कार्यकारी अभियंता सामसे, उपकार्यकारी अधिकारी दिपक थोरात, शाखा अभियंता पवन शिंत्रे, नितीन मुंडे, शालिकराम आंडील, माधुरी चौधरी आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत डीपी जळाला, बंद पडला, डीपी मिळत नाहीत, पैसे भरले मात्र वीज जोडणी केली जात नाही, वाढीव वीज बिले, शेतीत आणि अनेक गावात पोल आडवे पडले, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत वीज पुरवठयाच्या त्रुटी-अनियमीतता, लाइनमन कामे करत नाहीत त्यांची मनमानी, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनेची वीज बिल आकारणी सुरूच अशा विविध वीज पुरवठयाच्या वैयक्तीक आणि सार्वजनिक प्रश्न रेणापूर, आनंदवाडी, कुंभारवाडी, गरसुळी, पानगाव, फरदपूर, घनसरगाव, पोहरेगाव, कुंभारी, भोकरंबा, रामवाडी, टाकळगाव, खरोळा, गव्हाण, कारेपूर यासह अनेक गावच्या नागरीकांनी आ. रमेशअप्पा कराड यांच्या समोर प्रश्न मांडले.
वीज पुरवठा ही जीवनावश्यक बाब बनली असून शेतकर्यांसह सर्व प्रकारच्या वीज ग्राहकाचे प्रश्न प्राधान्याने तात्काळ सुटले पाहिजेत. सार्वजनिक पाणी पुरवठयाबाबत कोणाचाही हालगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगून या बैठकीत बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, शेतकरी-लाइनमन आणि अधिकारी यांनी समन्वय ठेवून वीज पुरवठयाचे नियोजन करावे, कोणाची तक्रार पुन्हा येणार नाही याची काळजी घ्यावी.
कोरोना काळात वीज ग्राहकांना देण्यात आलेली सरासरी वाढीव वीजबिले संदर्भात वीज ग्राहकाच्या व्यापक बैठका घेवून अतिरिक्त वीजबिले कमी करावीत आणि वीज वापराचे योग्य ती बिले कशा पध्दतीने देता येतील यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून आ. कराड म्हणाले की, वीज ग्राहकांनी ही वीज वापराची बिले वेळेवर भरून वीज विभागत सहकार्य केले पाहिजे. नियमीत वेळेवर वीजबिले भरणा करणार्या ग्राहकास कोणी आडवणुकीची भूमीका घेतील तर रमेश कराड त्या वीज ग्राहकाच्या पाठीशी आहे असे ठासून सांगीतले.
या बैठकीस त्या त्या विभागातील अधिकार्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. जे प्रश्न सहज सोडवणे शक्य आहेत ते तात्काळ सोडवले जातील उर्वरीत प्रश्न वरीष्ठांचे मार्गदर्शन घेवून निकाली काढण्यात येतील असे सांगून अधिकार्यांनी वीज ग्राहकांना दिलासा दिला. या बैठकीस पस सभापती रमेश सोनवने, जिप सदस्य सुरेंद्र गोडभरले, रेणापूरच्या नगराध्यक्षा आरती राठोड, उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे तालुाकध्यक्ष दशरथ सरवदे, ओबीसी आघाडीचे डॉ. बाबासाहेब घुले, माजी सभापती अनिल भिसे, रेणापूर भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, वसंत करमुडे, रमाकांत फुलारी, नरसिंग येलगटे, श्रीकृष्ण पवार, भाऊसाहेब गुळभिले, संतोष चव्हाण, उज्वल कांबळे, हरीकृष्ण गुर्ले, संजय डोंगरे, भूषण संपत्ते, श्रीकृष्ण मोटेगावकर, मारूती गालफाडे, प्रशांत डोंगरे यांच्यासह अनेक गावचे सरपंच, चेअरमन व इतर लोकप्रतिनिधी मोठया संख्येनी उपस्थित होते.