Homeसहकारकिल्लारीच्या कारखान्याचे पुनर्जीवन ही शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती-बी.बी. ठोंबरे

किल्लारीच्या कारखान्याचे पुनर्जीवन ही शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती-बी.बी. ठोंबरे

किल्लारीचा बंद पडलेला साखर कारखाना सुरू करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे; अभिमन्यू पवारांनी ते यशस्वी केले – बी. बी. ठोंबरे
औसा : बंद पडलेला निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर पुनर्जीवित करून यशस्वीपणे सुरू करणे हे असाधारण काम असून, आमदार अभिमन्यू पवार यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे, असे प्रतिपादन नॅचरल शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी केले.

किल्लारीच्या कारखान्याचे पुनर्जीवन ही शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती असून, बंद पडलेला कारखाना सहकारी तत्त्वावर पुन्हा सुरू होणे ही दुर्मिळ बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १६ ऑगस्ट रोजी किल्लारी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळावा व ऋणनिर्देश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बी. बी. ठोंबरे बोलत होते.

ठोंबरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी किल्लारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर किंवा अन्य मार्गाने देण्याच्या हालचाली सुरू होत्या. कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले; मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होईल का आणि सुरू झाल्यास तो शेतकऱ्यांच्या मालकीचा राहील का, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र सहकारी तत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज तो सुस्थितीत सुरू आहे.किल्लारी परिसरातील शेतकरी मेहनती असून, येथील माती व पाणी ऊस उत्पादनासाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना पुन्हा सुरू होणे ही मोठी उपलब्धी असल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले. ऊस उत्पादकांनी ठिबक सिंचनाचा अधिकाधिक वापर करावा, तसेच शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कारखान्याने साखरेसोबत उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

निळकंठेश्वर कारखान्यात डिस्टिलरी व सीएनजी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, निळकंठेश्वर साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कारखाना पुनर्जीवित करण्यात यश आले. कारखान्यावर लातूर व उस्मानाबाद येथील बँकांचे कर्ज असून, त्यापोटी कारखान्याची जमीन गहाण आहे. हे कर्ज फेडण्यासाठी एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असून, कर्ज मंजूर झाल्यास गहाण जमीन मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे पवार यांनी सांगितले.

आगामी काळात उपपदार्थ निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील. कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि कामगारांना दिलासा मिळाला असून, परिसरातील व्यवसाय व रोजगारालाही चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे यांनी प्रास्ताविकात आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून औसा बाजार समितीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. विविध विकासकामांमुळे बाजार समितीचा कायापालट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमास बी. बी. ठोंबरे,आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, किसान वेअरहाऊसचे एमडी हेमंत वैद्य, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकरप्पा राचट्टे, सचिव संतोष हुच्चे, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, अमोल पाटील,परीक्षित पवार, संदीपान शेळके, संतोष बेबंडे, युवराज गायकवाड, परमेश्वर धुमाळ, ऋषाल देशमुख, रवी चिलमे, युवराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले” – माजी आमदार ज्ञानराज चौगुले

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी निळकंठेश्वर साखर कारखाना सुरू करून आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठे काम केल्याचे सांगितले. शासन दरबारी आपले सर्व वजन वापरून त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. शासनाच्या विविध योजनांचा मतदारसंघातील नागरिकांना कसा फायदा होईल, यासाठी आमदार पवार सातत्याने प्रयत्नशील असतात, असे चौगुले म्हणाले……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments