*खंडापूर अखंड हरिनाम सप्ताह उत्सवातील ३.६५ कोटींच्या अपहार प्रकरणी पिस्तुल्या महाराजावर अखेर गुन्हा दाखल*
*कथित महाराज किशोर जाधवच्या अटकेसाठी भ्रष्टाचार विरोधी वारकरी कृती समितीच्या आंदोलनाला यश*
*लातूर, दि. ६ (प्रतिनिधी) खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहात कोट्यवधी रूपयाच्या देणग्या गोळा करून हिशेब न देताच पलायन केलेल्या तथाकथित महाराज किशोर जाधव याच्यावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भक्त – भाविकांच्या फसवणुकीचे हे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच लातुरात भ्रष्टाचार विरोधी वारकरी संपद्राय कृती समितीने सतत पाठपुरावा करून ते धसास लावले आहे. कृती समितीने नुकतेच त्यासाठी दोन दिवसाचे उपोषण केले. या आंदोलनाला अखेर यश आले असून या कथित महाराजाला पोलिसांनी आता त्वरित अटक करून लाखो भाविकांना न्याय मिळवून द्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे.
खंडापूर येथे यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या मराठवाड्यातील संतांच्या भव्य उत्सव सोहळ्यात जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या गैरव्यवहार प्रकरणी तथाकथित महाराज, उत्सवाचा मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव (शिवणीकर), त्याचा कथित सहकारी सोनवणे (अहिल्यानगर) व इतर काही सहकाऱ्यांविरुद्ध, अपहार आणि धमकीसंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
*भ्रष्टाचार विरोधी वारकरी कृती समितीचे आंदोलन*
किशोर जाधव यांना अटक करावी, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी वारकरी संपद्राय कृती समितीतर्फे समस्त लातुरकरांच्या वतीने दि. २८ व २९ मे २०२६ रोजी लातुरातील गांधी चौकात दोन दिवसाचे कृती समितीचे निमंत्रक शाम बरूरे, हभप रामकृष्ण शिंदे महाराज, चंद्रकांत आरडले, संदीपान बडगिरे, डॉ. गणेश गोमारे, सुनिल कावळे, महेश चामे, तुषार रेड्डी व इतर काही नागरिकांनी उपोषण केले. अनेक नागरिक तसेच भाविकांनी भेट देऊन या आंदोलनात भाग घेतला. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या प्रथम खबर क्रमांक ०३१२ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३(५), ३१६(२), ३१८(४) आणि ३५१(४) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा ६ जून २०२६ रोजी दाखल करण्यात आला.
*देणगीच्या नावाखाली कोट्यवधींची उभारणी*
तक्रारदार श्याम भारत बरुरे (रा. हरगुळ बु., ता. जि. लातूर) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत खंडापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उत्सवासाठी लातूरसह मराठवाड्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन जनसंपर्क मोहीम राबविण्यात आली. या बैठकींमध्ये भाविकांकडून देणगी संकलित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उत्सवानंतर उरलेली रक्कम देहू येथील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी वापरण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.याच धार्मिक भावनेतून हजारो भाविक, सेवेकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या. अनेकांनी रोख रक्कम, तर काहींनी गावागावातून सामूहिक देणगी जमा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
*ट्रस्ट नसताना पावत्या?*
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे उत्सवासाठी अधिकृत ट्रस्ट स्थापन करण्याचे ठरले असतानाही प्रत्यक्षात कोणताही नोंदणीकृत ट्रस्ट अस्तित्वात नव्हता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तथाकथित महाराज, उत्सवाचा मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव (शिवणीकर), याने ट्रस्टचा नोंदणी क्रमांक किंवा अधिकृत तपशील नसलेल्या सुमारे ३५०० पावती पुस्तिका छापण्यात आल्या. प्रत्येक पुस्तकात ५० पावत्या होत्या. या पावत्यांच्या आधारे तालुका प्रतिनिधी, सेवेकरी, गावकरी आणि भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी संकलित करण्यात आली. मात्र जमा झालेली रक्कम दररोज आयोजकांकडेच जमा केली जात होती आणि त्याचा स्वतंत्र लेखाजोखा कोणालाही उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा आरोप आहे.
*५.९८ कोटी जमा, ३.६५ कोटींचा कथित अपहार*
तक्रारदाराने पोलिसांकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, उत्सवासाठी एकूण ५ कोटी ९८ लाख ९५ हजार २४२ रुपये इतकी देणगी जमा झाली होती. त्यापैकी २ कोटी ३३ लाख ८ हजार १६६ रुपये विविध खर्चासाठी वापरण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मात्र उर्वरित ३ कोटी ६५ लाख ८७ हजार ७६ रुपये या रकमेचा कोणताही अधिकृत हिशोब सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही रक्कम अपहारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
*पावत्या आणि पुरावे पोलिसांकडे*
तक्रारदाराने चौकशीदरम्यान विविध गावांमधील २९ मूळ पावत्या पोलिसांकडे सादर केल्या आहेत. या पावत्यांवरील एकूण रक्कम ६ लाख ४३ हजार ९५४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय स्वतःने दिलेल्या ११ हजार रुपयांच्या देणगीची पावती देखील पुरावा म्हणून जोडण्यात आली आहे.तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, उत्सवाशी संबंधित मूळ पावती पुस्तके, हिशोबाच्या वह्या आणि आर्थिक नोंदी आयोजकांनी स्वतःकडेच ठेवल्या. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहाराचा तपशील सेवेकऱ्यांनाही उपलब्ध झाला नाही.
*हिशेब मागितल्यावर धमकी?*
या प्रकरणात केवळ आर्थिक गैरव्यवहाराचेच नव्हे तर धमकावल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, देणगीचा हिशोब मागितल्यानंतर संबंधितांनी सोशल मीडियावर बंदुकीचे छायाचित्र असलेले स्टेटस ठेवून “पाहून घेऊ” अशा आशयाचा इशारा दिला होता. यामुळे सेवेकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप आहे.
*वारकरी वर्तुळात चर्चेला उधाण*
मराठवाडाभरातून हजारो वारकरी, कीर्तनप्रेमी आणि भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. त्यामुळे आता समोर आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे धार्मिक क्षेत्रात आणि वारकरी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक भाविकांकडून जमा झालेल्या देणगीच्या पैशांचा नेमका वापर कसा झाला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, पोलिसांनी तक्रार, जबाब, पावत्या आणि इतर दस्तऐवजांच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम, खर्चाचे तपशील आणि निधीच्या वापराबाबतचे सर्व दावे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांचे सत्य आणि कथित अपहाराचे वास्तव तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.*महत्त्वाचे मुद्दे*▪️ उत्सव कालावधी : २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ ▪️ ठिकाण : खंडापूर ▪️ FIR क्रमांक : ०३१२▪️ गुन्हा दाखल : ६ जून २०२६ ▪️ कथित जमा देणगी : ₹५,९८,९५,२४२ ▪️ कथित खर्च : ₹२,३३,०८,१६६▪️ कथित अपहार : ₹३,६५,८७,०७६▪️ जप्त/सादर पावत्या : २९ ▪️ पावत्यांवरील रक्कम : ₹६,४३,९५४ ▪️ लागू कलमे : BNS 3(5), 316(2), 318(4), 351(4)




