मुशाफिरी आकाशवाणीची

0
700

मुशाफिरी आकाशवाणीची

सुप्रसिद्ध शैलीदार साहित्यिक , कै.रवींद्र पिंगे ‘ 1981 च्या सुमारास ‘मुंबई आकाशवाणीवर ‘ साहित्यविषयक विभाग पहात असत. त्यांनी माझ्या काव्यवाचनाचा कार्यक्रम रेडिओवरून सादर केला होता.

माझ्या बहुतांश कविता त्याकाळी मुक्त

छंदात लिहिलेल्या होत्या . पिंगेसरांनी तेव्हा एकदा मला अनपेक्षितपणे विचारणा करून बुचकळ्यातच टाकलं…. ” मुक्तछंदाला कधी सोडणार ? ”

त्या दिवसात मी “गदिमांची” सून होणार असल्याची कुणकुण त्यांच्या कानी तर पडली नसेल?…म्हणून तर त्यांनी मला छंदोबद्ध” कविता लिहिण्याविषयी सुचवलं असावं किंवा कसं? …..

असे नाना विकल्पांचे तरंग त्यावेळी माझ्या मनात उमटून गेले होते.

माझे पती शरत् कुमारची {माडगूळकर }चुलत बहीण ‘ज्ञानदा नाईक’ तेव्हा “किशोर” मासिकाची संपादिका होती.तिचे यजमान ‘मुकुंद नाईक’ त्या काळात

मुंबई आकाशवाणीवर निर्माते म्हणून रुजू झाले होते. त्यांनीच स्वत: पुढाकार घेऊन आमच्या विवाहाची रुजवात करुन दिली होती.

व्यंकटेश तात्यांच्या”अक्षर” बंगल्यात आमच्या

लग्नाची प्राथमिक बोलणी पार पडली होती.

तसंच आमची पट्टमैत्रीण “ज्योत्स्ना देव” { कविता करकरे }ही सुध्दा आकाशवाणी हेच तिचं रैंदेवू” ठरल्यामुळे

यथावकाश पोलीस आयुक्त “हेमंत करकरे ” यांची सहचारिणी बनली.त्या दोघांच्या मुग्धावस्थेतील “Courting period” चे आम्ही साक्षीदार होतो.

दुर्दैवाने आज ते दोघंही हयात नाहीत. हा एक

दैवदुर्विलासच !

निर्माते मुकुंद नाईक तेव्हा कोकणी विभाग असलेल्या दालनात बसत असत.’ललिता खंडेपारकर, दुर्गा नेवरेकर, माशेलकर’ आदी गोंयच्या सहकाऱ्यांशी त्यांच्याआपसात कोंकणीतून गप्पा ऐन रंगात आलेल्या असायच्या….. “अश्शें …..”

अनुनासिक हेल काढून बोललेले ते ‘कोंकणीतले संवाद’ ऐकत राहायला मौज वाटायची.

मुंबई आकाशवाणीचं फेमस कँटीन सदैव गजबजून गेलेलं असायचं. एकंदरीतच तिथलं मोकळंढाकळं वातावरण , तिथं वावरणारी कलासक्त , प्रेमळ सहकारी मंडळी यामुळं आम्हां सर्वांना ते ‘ माहेरघरच ‘ वाटे.

एकदा माझे मामा,मामीही कुतुहलाने आमच्यासोबत आकाशवाणीचा स्टुडिओ पहायला म्हणून मुद्दामहून आले होते.

रेडिओच्या व्रुत्तविभागाचे प्रमुख ‘ मनोहर पडते, ललिता नेने , कुसुम रानडे ‘ यांसारख्या कसलेल्या ज्येष्ठ वार्ताहरांकडे बातम्या देण्याचा अनुभवही आम्ही घेऊन पाहिलाय … येथील “टेलेप्रिंटरवरुन” क्षणाक्षणाला येणाऱ्या बातम्या संकलित करुन ‘खबरे’ देण्याचा हा आगळाच प्रकार अनुभवायला मिळायचा.

1982च्या आसपास “युवावाणी” अंतर्गत” , “कॉफी हाऊस” हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय झाला होता.

मराठी सिनेमातला एकेकाळचा सुपरस्टार ‘लक्ष्मीकांत बेर्डे ,विनोदी नट विजय कदम आणि अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ’ त्याकाळी आकाशवाणीवर उमेदवारी करीत होते.

हे त्रिकूट ‘कॉफी हाऊस’ या गाजलेल्या कार्यक्रमात , संवाद नाट्यातून उस्फूर्तपणे

धमाल उडवून देत. त्याचं निवेदन माझी बहीण , ‘ प्रीता’ करीत असे .

कधी कधी घरी गप्पा मारताना, माझे वडील “ओष्ठव्य” म्हणजे काय , तसंच आवाजाचा ‘volume आणि pitch’ ,यामधील सूक्ष्म फरक आदी बारकावे आम्हाला समजावून सांगत असत.

रेकॉर्डिंग करताना मला या माहितीचा अत्यंत उपयोग होई.

तसंच ‘निवेदन’ किंवा संवादातून भूमिका वठवताना, आपलं माइकसमोरील अंतर

गरजेनुसार कसं नियंत्रित करायचं , याचा वस्तुपाठच आम्हांला अपसुकच मिळत गेला.

ते दिवसच भारलेले होते.

या मुंबई आकाशवाणी केंद्रावरील मातब्बर अधिकारी मंडळींची नावंही तुम्हाआम्हाला नित्य स्मरणातलीच आहेत.( विशेषत्वाने दूरदर्शनचे आक्रमण होण्याअगोदर.) “रवींद्र पिंगे, विमल जोशी पुरुषोत्तम दारव्हेकर,नीलम प्रभू, माधव कुलकर्णी लीलावती भागवत,बाळ कुरतडकर,सुनंदा देशपांडे आणि “टेकाडे भावजी” म्हणजे प्रभाकर जोशी. ”

आता या रेडिओ च्या आठवणी ‘बकुळीच्या सुगंधा’सारख्या मनीमानसी अलवारपणे जपून ठेवायच्या. ‘अहा ते सुंदर दिन हरपले…….’

नीता माडगूळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here