32.5 C
Pune
Sunday, June 21, 2026
Home राष्ट्रीय *वाचक मंच*

*वाचक मंच*

0
604

वाचक मंच
मराठी कट्टा – मराठी ग्रंथ संग्रहालय आणि भावतरंग क्रिएशन्स, हैदराबाद यांचा संयुक्त उपक्रम
दुसऱ्या सत्राचा वृत्तांत
रविवार, दि. १७ ऑक्टोबर २०२१
मराठी कट्टा-मराठी ग्रंथ संग्रहालय आणि भावतरंग क्रिएशन्स, हैदराबाद यांच्या संयुक्त विचारातून साकारलेल्या ‘वाचक मंच’ या वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि हैदेराबादेतील वाचकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचे दुसरे सत्र काल रविवार, दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कै. काशिनाथराव वैद्य (KVM hall) सभागृहात यशस्वीरित्या पार पडले. यापूर्वी झालेल्या वाचक मंचच्या उद्घाटनाच्या सत्रात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे दोन माजी अध्यक्ष श्री. भारत देगलूरकर आणि डॉ. विजय पांढरीपांडे तसेच प्रथितयश लेखिका आणि वक्त्या डॉ. शरयू देशपांडे आणि सौ. प्रिया जोशी हे ‘वाचक वक्ते’ होते.

दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात श्री. महेश भागवत, (IPS, अतिरिक्त पोलिस महानिदेशक, तेलंगण राज्य, पोलीस आयुक्त राचकोंडा) आणि डॉ. विद्या देवधर (अध्यक्ष मराठी साहित्य परिषद, तेलंगण) हे मान्यवर वाचक वक्ते म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्राप्रमाणेच या दुसऱ्या सत्रातही श्रोत्यांनी प्रत्यक्ष आणि online अशी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरेल सुरुवात कु. मैथिली पत्की यांच्या सुश्राव्य सरस्वती वंदनेने झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्यवाह श्री. सतीश देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालयाकडून करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांचा मागोवा घेतला. दिवाळी अंक योजना २०२१ लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी सभागृहास दिली.


वाचक-वक्ते श्री. महेश भागवत यांनी १९३९ साली प्रकाशित झालेल्या श्री. विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीबाबत अत्यंत ओघवत्या भाषेत माहितीपूर्ण विवेचन केले. त्या काळची द्वितीय महायुद्धजनक परिस्थिती आणि तिचा कादंबरीच्या कथानकाशी असलेला संबंध श्री. भागवत यांनी स्पष्ट केला. मुद्देसूद विवेचन, संक्षिप्त कथानिवेदन, पात्रांचा परिचय आणि सांगोपांग अभ्यास यांच्या साहाय्याने त्यांनी कादंबरीचा गाभा उकलून दाखवला. या कादंबरीची लेखनतंत्रात्मक आणि संज्ञाप्रवाहविषयक चर्चाही त्यांनी केली. आजच्या काळातही टिकून असलेले या महान कादंबरीचे औचित्य त्यांच्या भाषणातून दृ्ग्गोचर झाले. सर्वच श्रोते या रसग्रहणामुळे मंत्रमुग्ध झाले होते.
वाचक-वक्त्या डॉ. विद्या देवधर यांनी सरस्वती सन्मान प्राप्त श्री. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीचे कथानक प्रभावी भाषणाद्वारे श्रोत्यांसमोर उभे केले. केवळ दलित साहित्यातच नव्हे तर समस्त मराठी साहित्य जगतात या कादंबरीला आणि तिच्या लेखकाच्या सर्वसमावेशक भूमिकेला आगळे स्थान का आहे याचा उहापोह त्यांनी केला. कादंबरीच्या कथानकातील काही हृदयद्रावक प्रसंगही डॉ. देवधर यांनी मांडले आणि त्या प्रसंगांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्नांची गरज स्पष्ट केली. त्यांच्या या तळमळीच्या वक्तृत्त्वामध्ये श्रोत्यांना सामाजिक भान आणण्याचे सामर्थ्य होते.


त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये श्री. भागवत यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता भागवत (IFS, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, तेलंगण राज्य) यांनी वाचन संस्कृती आणि तिच्या संवर्धनाची गरज विशद करून वाचक मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मराठीसोबतच इतर भाषांमधील पुस्तकांचा परिचय अशाच पद्धतीने करून देण्यात यावा असा आग्रह धरला.

यानंतर मुक्त प्रतिक्रिया सत्रामध्ये महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. विवेक देशपांडे आणि उपाध्यक्ष श्री. आनंद कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती विकासासाठी अगदी नजीकच्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम हाती घेण्याचे आश्वासन दिले. हा अर्थातच वाचक मंचच्या चळवळीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा लागेल.
याप्रसंगी ‘रंगधारा – द थिएटर ग्रुपचे’ संस्थापक श्री. भास्कर शेवाळकर सर, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ श्री .मधुसूदन जोशी, डॉ. नयना जोशी आदी मान्यवर श्रोत्यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच या व्यासपीठावर जास्तीत जास्त प्रमाणात तरुणाईला संधी द्यावी आणि नव्या पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यात योगदान द्यावे असे आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भावतरंग क्रिएशन्सचे अध्यक्ष श्री. प्रकाश तुळजापुरकर यांनी वाचक मंचाच्या यापुढील कार्यक्रमांमध्ये या सर्व सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
युवाप्रतिनिधी म्हणून सौ. मुक्ता धर्म पाटील यांनी उगवत्या पिढीत वाचनाची आवड रुजवण्यासाठी जुन्या पिढीच्या योगदानाची गरज नमूद केली. उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि उपक्रमाचे कौतुक केले. रणांगण आणि सनातन या कादंबऱ्या आवर्जून वाचण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली हे या सत्राचे फलित होते.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन श्री. माधव चौसाळकर यांनी केले. भावतरंग क्रिएशन्सचे चिटणीस श्री. विजय नाईक यांनी श्री. महेश भागवत यांची तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारी सभासद कु. योगिनी फळणीकर यांनी डॉ. विद्या देवधर यांची ओळख करून दिली. तसेच भावतरंग क्रिएशन्सचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश धर्म यांनी वाचक वक्त्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
याशिवाय श्री. विजय नाईक facebook live, सौ. सुवर्णा नाईक व श्रीमती माधवी नेने सजावट, श्री. अखिलेश वाशीकर videography, छायाचित्रण सौ. वृषाली सिंग बायस तसेच इतर सहाय्यकार्यात कु. योगिनी फळणीकर यांची मोलाची मदत झाली. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सौ. वैदेही दलाल यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

या वाचक मंचच्या दुसऱ्या सत्राचे फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग https://www.facebook.com/groups/866428917205328 या ठिकाणी पाहता येईल. वाचक आणि श्रोतागण मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पास जोडले जावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शब्दांकनः श्री. माधव चौसाळकर,

साहाय्यः श्री. विजय नाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]