Homeताज्या बातम्याशेतातील वादातून झालेल्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

शेतातील वादातून झालेल्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप

शेतातील किरकोळ वादातून झालेल्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; शास्त्रशुद्ध तपास व प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्याला यश.

लातूर; (प्रतिनिधी)- शेतातील किरकोळवादातून झालेल्या खून प्रकरणात बालाजी रामराव वरबटे या आरोपीस निलंगा येथील न्यायमूर्ती एस बी पवार यांनी जन्मठेपची शिक्षा ठोठावली.
          प्रत्येक गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध तपास करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळवून देणे ही लातूर जिल्हा पोलीस दलाची सर्वोच्च प्राथमिकता असून गुन्ह्याचा तपास, पुरावे संकलित करणे, साक्षीदारांचे संरक्षण, न्यायालयीन समन्वय आणि सरकारी पक्षास सक्षम सहकार्य या सर्व बाबींचा प्रभावी मेळ साधल्यासच पीडितांना न्याय मिळतो आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो. याच बांधिलकीतून सन २०१९ मध्ये निलंगा तालुक्यात घडलेल्या खून प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावत लातूर पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब केली आहे.
                   दि. १३ मार्च २०१९ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास निलंगा–अनसरवाडा रोडवरील एकाच्या शेतात घराची चावी देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. आरोपी बालाजी रामराव वरवटे, रा. पेठ, ता. निलंगा याने शेतमजूर अंकुश निवृत्ती आवले (वय ५५ वर्षे) यांच्यावर काठी व कुऱ्हाडीने हात, पाय, पाठ, पोट, छाती आणि कपाळावर गंभीर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, निलंगा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी नेत असताना दि. १५ मार्च २०१९ रोजी पहाटे सुमारे २.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

                या घटनेनंतर मृताचा मुलगा राम अंकुश आवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे निलंगा येथे गुन्हा क्रमांक ८६/२०१९ अन्वये भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

          सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गोपाळ रांजणकर व पोलीस निरीक्षक श्री. अनिल चोरमले यांनी अत्यंत बारकाईने केला. घटनास्थळावरील पुरावे, पंचनामे, वैद्यकीय पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून आरोपीविरुद्ध भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

              सदर खटल्याची सुनावणी मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथील मा. न्यायाधीश श्री. एस. बी. पवार यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. के. व्ही. पंढरीकर यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीविरुद्धचे पुरावे सक्षमपणे न्यायालयासमोर मांडले. प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजात पोलीस अमलदार एस. के. बुलबुले यांनी पैरवी अंमलदार म्हणून तर सहायक पोलीस निरीक्षक श्री. एस. बी. वाघमारे यांनी न्यायालयीन समन्वय अधिकारी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. 
           सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपी बालाजी रामराव वरवटे यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५,००० दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्त कारावास, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम ३(२)(व्ही) अन्वये सात वर्षे सक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
          हा निकाल केवळ एका खून प्रकरणातील दोषसिद्धी नसून, शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे, प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा आणि सरकारी पक्षाच्या समन्वित प्रयत्नांचे फलित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments