यशोगाथा
आपल्या प्रत्येक सणाचं काही ना काही खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्या त्या वेळी घरोघरी पाककला आणि कलाकुसर यातलं कौशल्य आत्मसात करण्याची आणि अंगी असलेलं कसब दाखवण्याची संधी आपसूकच मिळत असे. आता सगळ्यांना संक्रांतीचे वेध लागले आहेत. संक्रांत म्हटलं की तीळगूळ, गुळाची पोळी आणि हलव्याचे दागिने यांची आठवण येतेच. छोट्या बाळांना आणि नव्याने लग्न झालेल्या नवरा नवरीला हलव्याचे दागिने घालून हौसेने सजवलं जातं. वेळ आणि कौशल्य यांच्या अभावी अलीकडे हे दागिने घरी करण्याऐवजी विकत आणण्याची पद्धत आहे. त्यातूनच त्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. गेली 53 वर्ष हा व्यवसाय करणाऱ्या गाडगीळ कुटुंबाची ही यशोगाथा…

जवळपास ९९ प्रकारचे हलव्याचे दागिने बनवले जातात.
एका सिझनमधे हलव्याच्या केवळ नथींच्या १००० नगांची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना हलव्याचा हार आणि पगडी घालायचे स्वप्न पूर्ण.
१९७० सालापासून गाडगीळ कुटुंबीयांचा शारदा प्रॉडक्ट नावाने व्यवसाय आहे.ख-या दागिन्यांच्या तोडीचे असे हलव्याचे दागिने ते घडवतात. विद्या गाडगीळ यांनी हा व्यवसाय सुरु केला. विद्याताईंना कला कौशल्याची खूप आवड होती. त्यावेळेस पुण्यातील प्रसिध्द काका हलवाईंच्या दुकानात ताईंनी केलेले दागिने विक्री साठी ठेवले जात असत.
हळूहळू कामाचा व्याप वाढला, वर्षागणिक दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार वाढत गेले, तसंच दुकानांची संख्या वाढली, केवळ पुणे नव्हे तर मुंबई, नाशिक, सोलापूर, सांगली, बडोदा ते थेट परदेशात ताईंनी केलेले हलव्याचे दागिने पोहचू लागले.
१९८० साली ताईंच्या मुलाचे लग्न झाले, नव्या सुनबाई श्रीरेखामुळच्या हैद्राबादच्या, लग्न होवून पुण्यात आल्या आणि घरच्या व्यवसायात सहभागी झाल्या. श्रीरेखा ताईंनी दागिने कसे घडवायचे याचे प्रशिक्षण सासूबाईंकडून घेतले, पुढे त्यांनी विद्याताईबरोबर दागिने घडवायला सुरवात केली.

आज ५३ वर्षाची परंपरा गाडगीळ यांच्या हलव्याच्या दागिन्यांना आहे. सुरवातीस विद्याताई खरा दागिना समोर ठेवून त्याप्रमाणे दागिना घडवायच्या. आता सरावाने दागिना समोर नसतानाही त्या हुबेहूब तसाच दागिना हलव्याचा करतात.
गाडगीळ यांच्या हलव्याच्या दागिन्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे दागिने मण्यांवर हलवा करुनकेले जातात. त्यामुळे यासाठी साखर कमी लागते. मण्यांवरचा हलवा अगदी एका तासात होतो. याउलट ऐरवीचे जे हलव्याचे दागिने असतात त्याला जास्त साखर लागते. तसंचत्यावर काटा यायला जवळपास आठ तासांहून अधिक वेळ लागतो, त्यामुळे ते काम तसं निगुतीनं करण्याचं आणि वेळखाऊ आहे.मण्यांवरच्या हलव्याचे फायदे म्हणजे हा हलवा पटकन होतो, त्यामुळे दर्जा आणि घाऊक प्रमाणात तो सहज करता येतो. मण्यांचे होल मोकळे रहात असल्याने सुई दोरा वापरून मणी एकमेकांत ओवणे सोप्पे जाते. त्यामुळे दागिन्यांवरचा हलवा गळून पडला असं होत नाही.

दागिना टिकण्याच्या दृष्टिकोनातूनही याप्रकारचा हलवा उत्तम आहे.दोन-तीन वर्ष दागिने सहज वापरता येतात. त्यानंतर दागिने साध्या पाण्यात टाकले की त्यावरची साखर विरघळली जाते, ते मोती परत कुठेही वापरतां येतात.तसंच मण्यांच्या हलव्याचे दागिने अगदी ख-या दागिन्यांप्रमाणे घडवतां येतात.मण्यांच्या वेगवेगळ्या आकारावर हलवा बनवला जातो.जसं की अगदी छोटे मणी, मध्यम, आकाराने मोठे मणी असे हे विविध आकार दागिन्यांत सहजपणे वापरतां येतात.मुख्य म्हणजे हा हलवा मशिनवर केला जातो, श्रीरेखाताईंच्या यजमानांनी अथक प्रयत्न करुन हलवा बनविण्यासाठी खास मशिन बनवले आहे.
बरेचजण लहान मुलांसाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ताईंकडचे दागिने परदेशात घेऊन जातात. आत्तापर्यत अमेरिका, दुबई, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी ताईंनी बनवलेले हलव्याचे दागिने पोहचले आहेत.परदेशात दागिने नेताना त्याचे बबलरॅप पॅक करुन दिले जाते.

शारदा प्रॉडक्टचे आज जवळपास नव्वद प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. यात पारंपरिक प्रकाराबरोबर ग्राहकांच्या मागणीनुसार नाजूक डिझाईनचे दागिने घडविले जातात. तन्मणी, चिंचपेटी, मोहनमाळ, नक्षत्र हार, चंद्रिका हार, महालक्ष्मी सेट असे अनेक दागिने आहेत. तर पुरुषांच्या सेटमधे सुद्धा भरपूर प्रकारचे दागिने आहेत. या सेटची किंमत साधारण चार हजार रुपयांपर्यत आहे. लहान मुलांसाठी देखील वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. विविध रंगामधे, गोल्डन, तसंच कमी किंमतीचा नुस्ता फोटोपुरता घालता येईल असा सेट देखील उपलब्ध आहे.
संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यातील चतुःशृंगी देवी, पद्मावती, गणपतीपुळ्याचा गणपती तसंच महाराष्ट्रातील विविध देवस्थानात ताईंचे हलव्याचे दागिने देवांसाठी पोहचले आहेत.
लेखन :भाग्यश्री चौथाई
( साभार : ई यशस्वी उद्योजक )




