Homeसांस्कृतिकआकाशवाणीवर सोमवारपासून 'सोलापूरची नाट्यगाथा'

आकाशवाणीवर सोमवारपासून ‘सोलापूरची नाट्यगाथा’

आकाशवाणीवर सोमवारपासून ‘सोलापूरची नाट्यगाथा’ मालिका सोलापुरी नाटक आणि रंगभूमीचा शंभर वर्षांचा मौखिक इतिहास

सोलापूर : शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी ‘सोलापूरची नाट्यगाथा’ ही सोलापूरी रंगभूमीचा शंभर वर्षांचा मौखिक इतिहास टिपणारी अभ्यासपूर्ण मालिका सोमवारपासून (ता. १ जून) सोलापूर आकाशवाणीवर दररोज सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.

अतिशय नाविन्यपूर्ण माहिती आणि सोलापूरचा देदिप्यमान नाट्येतिहास उलगडणाऱ्या या मालिकेचे संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांनी केले आहे, तर सादरकर्ते डॉ. सोमेश्वर पाटील आहेत.१८९५ ते १९०० या पाच वर्षांत सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्यसंस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. ‘संगीत एकच प्याला’चा तेलुगु नाट्यप्रयोग ‘सुरा वंशहारा’ नावानं विष्णू प्रासादिक नाट्यमंडळाने सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्यप्रयोगांनाही हाऊसफुल्ल गर्दी होत असे. चित्रपटाचे खेळ रोज होतात, हे आपल्या ठाऊक आहे, पण नाटकाचे खेळ सतत सहा महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? सोलापूरच्या रसिक प्रेक्षकांबद्दल आणि रसिकाग्रणींबद्दल त्यांना अपार आदर होता, त्यांच्याविषयीची अनोखी माहिती या मालिकेत आहे.

‘‘प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षाऋतूत मोरांना नाचायला लावणं,’’ असं वर्णन असणाऱ्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग १९६० सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनेकदा प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सोलापूरच्या नाट्यसंस्था म्हणजे ‘नाट्य आराधना’ आणि ‘निशिगंध नाट्य मंदिर’! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री निधीतून एक लाख रूपयांचे विशेष अनुदान दिलेली एकमेव हौशी नाट्यसंस्था म्हणून नाट्यआराधनाचा गौरव झाला. या संस्थांनी सादर केलेल्या विक्रमी नाटकांची माहिती प्रस्तुतच्या ‘नाट्यगाथे’त आहे.जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सिनेअभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैय्याज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली ती ‘ललित कला मंदिर’ या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ‘ललित कला मंदिर’चे नाव अगोदर ‘नवी दिशा’ असे होते.

विशेष म्हणजे ‘नवी दिशा’ हे या संस्थेतील कलावंतांनी केलेल्या नाटकाचे नाव होते. सोलापूरातील जुन्या नाट्यसंस्था, तेलुगु, मराठी, कन्नड, उर्दू, बाल, दलित रंगभूमीची माहिती या मालिकेतून देण्यात आली आहे. सोलापूरच्या एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही इथली रंगभूमी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे श्री. जोशी यांनी नमूद केले आहे. ०००चौकटसोलापूरातून मराठी रंगभूमीची मुहुर्तमेढ१८४३ साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, असे मानले जाते. पण त्याच्याआधी पन्नास वर्षे सोलापूरच्या कविराय राम जोशी या कलावंताने पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहुर्तमेढ रोवली. त्याआधी सोलापूर जिल्ह्यातील वडवळसिद्ध नागेशांनी शाहिरी आखाड्यांमधून गाव-खेड्यातील कलावंतांना चालना दिली आणि एतद्देशीय रंगभूमी जन्माला आली, याविषयीचे महत्त्वपूर्ण संशोधन या मालिकेतून श्री. रजनीश जोशी यांनी केले आहे.०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments