लातूरच्या विकासासाठी महायुती व घटक पक्षांचा गांधी चौकात एल्गार; काँग्रेसविरोधात तीव्र घोषणाबाजी
लातूर : लातूर शहरातील कचरा, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या दुरवस्थेसारखे मूलभूत प्रश्न दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत असताना सत्ताधारी काँग्रेसकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करत महायुती व घटक पक्षांच्या वतीने आज गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा उभारण्याच्या प्रश्नावरून लातूरचे राजकारण तापले आहे.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल 28 महत्त्वाच्या विषयांना बगल देत केवळ पुतळा राजकारणावर चर्चा करून अखेर राष्ट्रगीताच्या आडून सभा गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. नही सहेंगे, नही सहेंगे, आमदार अमित देशमुख की तानाशाही नही सहेंगे, लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार्यांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच आंदोलनकर्त्यांनी महात्म्यांच्या पुतळ्यांच्या नावावर होणारे घाणेरडे राजकारण तात्काळ थांबवावे, अन्यथा महायुतीच्यावतीने लातूरमध्ये मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी बोलताना दिला.

यावेळी या निदर्शने आंदोलनाला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अॅड व्यंकट बेद्रे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देविदास काळे, गटनेते दीपक मठपती, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, महामंत्री प्रवीण कस्तुरे, संजय गिर,प्रमोद गुडे,लातूरचे महापालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रशांत पाटील, नगरसेविका रागिणीताई यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, गिरीश पाटील, शोभाताई पाटील, अनंत गायकवाड, भिमाशंकर बेंबळकर, स्वाती घोरपडे, प्रेरणाताई होणराव, करुणाताई शिंदे, गणेश गवारे, आदिती पाटील कव्हेकर, उद्धव तेलंगे, शितल मालू, विनज जाकते, राजेश्री धोत्रे, संगिता मिरचे, सत्यवती चेवले, ज्योती आवस्कर, जयश्री बाहेती,मंडल अध्यक्ष राहुल भुतडा,सुरेश जाधव,रोहित पाटील,गोपाळ वांगे,दिग्विजय काथवटे,नितीन कोरे,झुंजे पाटील,भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे,अनुसूचित मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, किशोर शिंदे,दत्ता चेवले,संतोष तिवारी, राजेश पवार, पांडुरंग बोडके, शशिकांत हांडे, सिमा करपे,सचिन जाधव, आफ्रिन खान यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकूरकरांचे स्मारक महानगरपालिका आवारातच उभारावे – डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूरची अस्मिता असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याच्या नावावर राजकारण करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. काँग्रेसचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले, पण त्यांचा हेतू केवळ गोंधळ निर्माण करण्याचा होता. चाकूरकर हे केवळ आमच्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेतृत्व होते. त्यामुळे त्यांचे ऐतिहासिक स्मारक महानगरपालिका परिसरातच उभारण्यात यावे, अशी भावना भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
चार दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन पेटवू – अजित पाटील कव्हेकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्यांच्या उभारणीचा निर्णय झाला असताना काँग्रेसकडून विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. महापुरुषांच्या नावावर राजकारण करण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे.काँग्रेसच्या सत्ताधार्यांनी कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून, पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी लातूरकरांची खरी अपेक्षा असताना ती कामे पूर्ण करण्याऐवजी पुतळा पाहणीवर लाखोंचा खर्च करून शासकीय निधीची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे पुतळा पाहणीच्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी शहर विकासाला प्राधान्य द्यावे. तसेच आण्णाभाऊ साठे चौकातील विकासकामांनाही अडथळे आणली जात आहेत. शहराच्या विकासाला विरोध करणार्या काँग्रेसचा आम्ही जाहीर निषेध करतो. चार दिवसांत आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास लातूरमध्ये ऐतिहासिक आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिला.
शिवराज पाटील चाकूरकरांचा पुतळा दर्शनीय ठिकाणी उभारण्यात यावा- अॅड. व्यंकट बेद्रेकाँग्रेस लोकभावनेपासून पूर्णपणे दुरावली आहे. लातूरचा सुवर्णकाळ चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांच्या काळात होता. आज मात्र त्यांच्या नावावर राजकारण करून शहराचा विकास खुंटवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पुतळा महानगरपालिका परिसरात उभारण्याची घोषणा केली असतानाही काँग्रेसकडून संकुचित राजकारण सुरू आहे. हे तात्काळ थांबवावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते अॅड.व्यंकट बेद्रे यांनी यावेळी बोलताना दिली.





