प्रत्येक क्षण नवं निर्मितीची संधी देत असतो – देवेंद्र भुजबळ
मुंबई : व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येकक्षणी नवीन काही करण्याची संधी मिळत असते. तुमच्या मनात प्रेरणा असेल, इच्छाशक्ती मजबूत, दांडगी असेल, भले परिस्थिती प्रतिकूल असेल परंतु मनस्थिती चांगली असेल तरच तुम्ही सतत काही नवं निर्मितीकरू शकता, म्हणून मनस्थिती महत्वाची आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘शब्दांच्या वाटेवर ‘ या कार्यक्रमात पूनम चांदोरकर यांनी त्यांची नुकतीच मुलाखत घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
आपण “शब्दांच्या वाटेवर” कसे वळलात ? असा प्रश्न मुलाखतकार चांदोरकर यांनी विचारला असता भुजबळ म्हणाले की, सहा वर्षांचा होईपर्यंत मी बोलू शकत नव्हतो. त्यानंतर बोलायला शिकलो. मूकबधिर कसे असतात, अगदी तशी अवस्था माझी होती. मग मी अशा क्षेत्राकडे वळलो की, दररोज बोलावे लागत असे कारण मी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सेल्समन म्हणुन काम करीत असे . मात्र अशा नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करण्यापेक्षा अशा क्षेत्रात जायचे की,ज्या मुळे आपल्याला जनजागृती करता येईल आणि म्हणुन मी पत्रकारितेकडे वळलो. नगर कॉलेजमध्ये शिकत असताना, दैनिक ‘ समाचार’ मध्ये उपसंपादक कम वार्ताहर म्हणून काम केले. पुढे पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर पुण्यातील दैनिक ‘केसरी’मध्ये उपसंपादक, त्यानंतर केसरीचेच प्रकाशन असलेल्या साप्ताहिक ‘ सह्याद्री’ मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. तेथे कव्हरस्टोरी लिहिल्या. पत्रकारितेत मात्र मर्यादा असतात. जसे वाचक साक्षर असायला हवा. वृत्तपत्राचे सरक्युलेशन मर्यादित असते. म्हणून पत्रकारिता सोडून मी दूरदर्शनमध्ये आलो. १९८६ ते १९९१ पर्यंत असे पावणेसहा वर्ष मी दूरदर्शनमध्ये आधी सहायक निर्माता आणि १९९१ साली यूपीएससी मार्फत निवड झाल्याने निर्माता म्हणून काम केले. पुढे महाराष्ट्राच्या बाहेर बदली होणार नाही, या आणि अन्य काही बाबींचा विचार करून शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यात रुजू झालो. जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक आणि संचालक झालो. मात्र या सर्व प्रशासकीय प्रवासात मी लिहिणं कधी सोडलं नाही, असे त्यांनी सांगितले.

साहित्याची गोडी कशी निर्माण झाली ? या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले की, माझे वडील सेल्समन होते. सुरवातीपासूनच मला वाचनाची गोडी होती. दोन-दोन महिने वडिल बाहेरच असत. ते घरी आले की, खूप मिठाया आणीत असत. वाड्यातील शेजार पाजारच्यांनाही ते त्या देत असत . परंतु पुस्तकांसाठी माझा त्यांच्याकडे आग्रह असायचा. त्यामुळे ते घरी आले की, परिकथा, गोष्टींचे पुस्तके आणून देत असत. आमचे घर अकोला येथील टेलिफोन ऑफिसजवळ होते. टेलिफोन ऑफिसची खूप मोठी लायब्ररी होती. त्यात तासन तास बसून मी वाचन करीत असे. वाचन म्हणजे शिक्षणाचा पायाच. मला लिखाणाची आवड होती म्हणून लिखाणापासून मी नाळ तुटू दिली नाही. ते म्हणाले की, ज्या परिस्थितीतून माझी जडणघडण झाली, त्यामुळे माझा ठाम समज झाला आहे की, परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती महत्वाची आहे. आज अनुकूल परिस्थिती असली तरी छोट्या छोट्या गोष्टींनी मुलं-मुली नाराज होतात. मग नको ते निर्णय घेतात. आकडेवारीतच सांगायचे झाल्यास गेल्या दहा वर्षात नैराश्यातून आयआयटीमधील पहिल्या ते चौथ्या वर्षांपर्यंतच्या जवळपास १२२ मुला-मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. तर एमबीबीएस , एमडी, एम एस सारख्या अभ्यासक्रमातील १२५ जणांनी गेल्या पाच वर्षांत आत्महत्या केल्या आहेत. एव्हढेच काय पोलीस दलातील कर्मचारी -अधिकारी धट्टेकट्टे असतात, सक्षम असतात असा आपला समज असतो. पण गेल्या पाच वर्षांत ४५ जणांनी आत्महत्या केल्या. या सगळ्यांचा विचार केल्यास यासाठी कारणे वेगवेगळी असू शकतात. म्हणुन माझे म्हणणे असते की ,बाह्य निकष न बघता आपली आवड ओळखून करिअर निवडल्यास आपण प्रत्येक क्षण आनंदात जगाल. यासाठी विद्यार्थ्यांना विविध अभ्यास क्रमांची माहिती मिळावी यासाठी मी मंत्रालयात माहिती संचालक असताना, आमच्या महान्यूज पोर्टलवर ” करिअर नामा” हे सदर सुरू केले. त्यात विविध अभ्यासक्रमांची माहिती देत असे. राज्यातील विविध वृत्तपत्रेही ही माहिती प्रसिद्ध करीत असत. त्यातूनच माझे “करिअरच्या नव्या दिशा ” हे पुस्तक प्रकाशित झाले . मनःस्थिती भक्कम असायला पाहिजे. तीच जर नसेल तर शारीरिक, मानसिकदृष्ट्या किंवा तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर सगळं काही असून नसल्यासारखे होते. म्हणूनच ज्या व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविले आहे अशाव्यक्तींच्या प्रेरणादायी कथा असलेली ११ प्रेरणादायी पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

तुमच्या पोर्टलद्वारे काही व्यक्ती पुढे आल्या त्याबाबत सांगा, असे विचारल्यावर ते म्हणाले, आज पर्यंत पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या लेख मालांपैकी चौदा लेख माला पुस्तक रुपात आल्या आहेत.या सर्व पुस्तकांचे संपादन मी केले आहे. आज जगात भौतिक, आर्थिक, तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे तर दुसऱ्या बाजूला सामाजिक, मानसिक, भावनिक अधोगतीही वेगाने होत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कसा मार्ग काढायचा? असा आजचा मोठा प्रश्न आहे. बालक, पालक, तरुण,वृद्ध असा सर्वामधील संवाद तुटत चालल्याची खंतही भुजबळ यांनी या मुलाखती दरम्यान व्यक्त केली. आजच्या तंत्रज्ञानामुळे माणूस जवळ येत चालला पण मनाने मात्र तो दूर जात आहे. ही विसंगती जी काही निर्माण होत चालली आहे, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपण पत्रकार , लेखक, संपादक आणि प्रकाशक अशा विविध भूमिकेत आहात. अशावेळी आपल्या प्रेक्षक, वाचकांना काय सांगाल ? या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना भुजबळ म्हणाले की, आपण जिथे आहात, ज्या जागेवर आहात विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आहात. शासनाचे २० लाख कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, बॅंक कर्मचारी -अधिकारी या सगळ्यांनी खुर्चीत जाऊन बसणे हे आपले उद्दिष्ट न ठेवता, खुर्चित जाऊन बसल्यानंतर आपण लोकांसाठी काय काम करू शकतो, आपल्या पद्धतीने समाजासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे, असे सांगून आज आपण घडलो परंतु लाखो लोक आपल्यामागे आहेत, त्यांना सेवा देऊन सक्रीय राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भुजबळ यांनी सुरवातीलाच दूरदर्शनच्या या जुन्या वास्तूत आल्याचा आनंद झाल्याचे सांगत जुन्या ठिकाणी आलो की जुन्या आठवणी जागृत होतात असे सांगून या वास्तूने मला आर्थिक स्थैर्य दिले, नावलौकिक दिला आहे. आज जो काही मी उभा आहे, त्याचे सर्व श्रेय या वास्तुला आहे, असे सांगून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दूरदर्शनचे आभार मानले.
शब्दांकन : शेषराव वानखेडे,ज्येष्ठ पत्रकार. ह.मु. गांधीनगर, गुजरात +91 98694 84800 .




