24 C
Pune
Saturday, August 22, 2026
Home महाराष्ट्र भविष्यवेध २०२६’ मधून करिअरसह राष्ट्रनिर्मिती आणि समाजभक्तीचा जागर

भविष्यवेध २०२६’ मधून करिअरसह राष्ट्रनिर्मिती आणि समाजभक्तीचा जागर

0
26

*‘भविष्यवेध २०२६’ मधून करिअरसह राष्ट्रनिर्मिती आणि समाजभक्तीचा जागर*

लातूर येथे बुधवारी युवा भारत मंचचा उपक्रम; धनंजय दशरथ यांची माहितीलातूर, दि. २१ – बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात करिअरच्या नव्या संधींची ओळख करून देण्यासोबतच योग्य क्षेत्राची निवड, कौशल्यविकास आणि भविष्यातील वाटचालीसाठी युवकांना दिशा देणे, तसेच राष्ट्रभक्ती, समाजभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करणे या व्यापक उद्देशाने ‘युवा भारत’ मंचतर्फे ‘भविष्यवेध २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालय, सावेवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ‘युवा भारत’ मंचचे श्री धनंजय दशरथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी युवा भारत मंचचे आयुष इटकर, आदित्य पाटील, निकिता साळुंके आदी उपस्थित होते. श्री धनंजय दशरथ म्हणाले की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात युवकांसमोर करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, केवळ वैयक्तिक यश आणि आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि क्षमतेचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी कसा करता येईल याची जाणीव युवकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.

‘भविष्यवेध २०२६’च्या माध्यमातून ‘स्वतःच्या भविष्याचा वेध घेताना देशाच्या भविष्याचाही विचार करणारा युवक’ घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे तीन प्रमुख सत्रांत आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत उद्घाटन सत्र होणार असून, यामध्ये नोंदणी, अल्पोपहार, प्रतिमा पूजन, मान्यवरांचा सत्कार आणि उद्घाटनपर भाषण होणार आहे.यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत करिअर मार्गदर्शनाचे विशेष सत्र होणार आहे. स्पर्धा परीक्षांबाबत लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, वैद्यकीय क्षेत्राबाबत जालना येथील जनरल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. नितीन गादेवाड, तर अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबाबत एलिमेंट्रि एआयचे संस्थापक श्री. मनोज सारडा मार्गदर्शन करणार आहेत.वाणिज्य क्षेत्रातील संधींबाबत सीए श्री. अमोल काबरा, कला क्षेत्रातील भविष्यातील संधींबाबत एसआरटीएमयू नांदेडचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग खडके तर उद्योग व व्यवसाय क्षेत्राबाबत जालना येथील पोलाद उद्योगातील श्री. नितीन काबरा युवकांशी संवाद साधणार आहेत. विविध शैक्षणिक शाखांतील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि आवश्यक कौशल्यांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळणार आहे.

करिअरसोबत राष्ट्रनिर्मितीची दिशा दुपारी १ ते २.३० या वेळेत ‘आरएसएस@१००’ हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह श्री. अतुल लिमये प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून, लातूरचे जिल्हाधिकारी श्री. भारत बास्टेवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सत्रामध्ये राष्ट्रभक्ती, समाजभक्ती, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका यावर विचारमंथन होणार आहे.देशाच्या विकासात केवळ शासन किंवा संस्था नव्हे, तर प्रत्येक जागरूक आणि कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे युवकांनी आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची भावना मनात रुजवावी, हा या सत्राचा प्रमुख संदेश असणार आहे.ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य यांचा समन्वय साधणारा युवक समर्थ समाज आणि सक्षम राष्ट्र घडवू शकतो या विचारातून ‘भविष्यवेध २०२६’ची संकल्पना पुढे नेण्यात येत आहे. स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासोबत समाजाचे आणि राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील व्यापक उद्देश आहे.

कार्यक्रमाचा समारोप भोजनाने होणार असून, सहभाग विनामूल्य आहे. मात्र या कार्यक्रमासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थी व युवकांनी नोंदणी अर्ज https://forms.gle/svR6P2m4TcfyHP5i8 या लिंक व्दारे भरून सहभाग निश्चित करावा. तसेच अधिक माहितीसाठी श्री. धनंजय दशरथ यांच्याशी ९९२१५७४६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.लातूर शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, बदलत्या काळातील करिअरच्या संधींचा वेध घ्यावा आणि त्याचबरोबर राष्ट्रभक्ती, समाजभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना मनात जागृत करून आपल्या ज्ञान-कौशल्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन ‘युवा भारत मंच’ तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]