खरोसा लेणीच्या कनेक्टिव्हिटीसाठी चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा
लामजना-खरोसा-निलंगा रस्त्याच्या चौपदरीकरणाची कार्यवाही सुरू; आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीला यश
औसा : औसा विधानसभा मतदारसंघातील ऐतिहासिक खरोसा बुद्ध लेणीला प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठी लामजना-खरोसा-निलंगा रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आ. अभिमन्यू पवार यांनी ही मागणी मांडल्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.कल्याण ते लातूर प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती मार्गामुळे मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड आदी जिल्ह्यांतील नागरिकांना मुंबईकडे जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या मार्गाचा लातूर जिल्ह्यातून, विशेषतः औसा विधानसभा मतदारसंघातून, मार्ग प्रस्तावित आहे.

खरोसा येथे प्राचीन बुद्धकालीन लेणी असून, या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून तसेच परदेशातूनही पर्यटक येतात. खरोसा हे ठिकाण औसा-उमरगा आणि लातूर-जहीराबाद या राष्ट्रीय महामार्गांना तसेच प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या लामजना-निलंगा प्रमुख जिल्हा मार्गावर आहे. मात्र, सध्या हा रस्ता दोनपदरी आणि अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणातील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात.मुंबई, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांतून द्रुतगती मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गाने येणाऱ्या पर्यटकांना खरोसा लेणीपर्यंत सुलभ आणि जलद पोहोचता यावे, यासाठी लामजना-खरोसा-निलंगा मार्गाचे चौपदरीकरण आवश्यक असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना याअगोदर दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा समावेश प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या कामात करण्यात यावा, अशी मागणी आ. पवार यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याने या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.चौपदरीकरणामुळे खरोसा लेणीची द्रुतगती मार्गाशी कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यासोबतच पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच औसा, निलंगा आणि परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधाही अधिक सक्षम होणार आहे…………..
खरोसा लेणीसारख्या ऐतिहासिक पर्यटनस्थळाला आधुनिक आणि जलद वाहतूक व्यवस्थेशी जोडणे ही काळाची गरज आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरातील पर्यटन आणि विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.




