युवराज पाटील हे अत्यंत संवेदनशील अधिकारी आहेत. अभ्यासू, सजग व कार्य तत्पर अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. सध्या ते पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.आजच्या सकाळ मध्ये 1993 मध्ये भूकंप झालेल्या किल्लारीवर त्यांनी लिहलेला लेख…!! दैनिक सकाळच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहोत. –संपादक
इथं किल्लारी… नावाचं गाव नांदत होतं…..!!
मंगळवारी सकाळी अचानक कार्यालयीन कामासाठी किल्लारीला जावं लागलं… होय तीच किल्लारी 30 सप्टेंबर 1993 ची काळी पहाट… धरणी दुभंगली होती… रात्री गुलालात रंगलेलं गाव पहाटे मृत्यूच्या सुनामीन गिळलं होतं… सगळं ते चित्र माझ्या डोळ्यात आजही नांदतंय.. कारण मी भूकंप झाल्यानंतर अवघ्या काही तासात लातूर वरून किल्लारी त्यानंतर सास्तूरला मदतीचा हात म्हणून गेलो होतो… डोळ्यातल खारट पाणी संपून कडवट होऊन कोरडं पडलं होतं… संवेदना बधिर होणं म्हणजे काय ते तेंव्हा कळलं होतं..!!

औसा ओलांडून लामजन्याला पोहचलो… चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा… मराठवाड्यातला आज पर्यंतचा सर्वात विशाल परवा औरंगाबादला यापेक्षा मोठा झाला आहे.. महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन गाडी वळसा घेऊन किल्लारीकडे निघाली.. मी किल्लारीला जाणार म्हणून अधिक चौकस होतो… हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे सिमेंटनी चकाचक झाला आहे… पण रस्ता नवा असून सुद्धा इतर ठिकाणापेक्षा भेगा अधिक दिसल्या अर्थात त्या भरून घेतल्या आहेत पण माझं मन म्हणत होतं की साला अजूनही ही जमीन आतून हादरे देत असेल का… मी अर्थातच भुगर्भ तज्ञ वा जाणकारही नाही पण सर्व सामान्य माणूस म्हणून हे प्रश्न पडले.

चलबुर्गा ह्या गावाची पाटी लागली आणि फ्लॅश बॅक सुरु झाला… हे गाव माझ्या मामीचे माहेर म्हणून या गावाला अनेक वेळा लहानपणी आलेलो.. त्यावेळी किल्लारी हे सोन्याची बाजारपेठ , एकेकाळची लातूरचीही बाजारपेठ…इथलं निळंकठेश्वराचे मंदिर पंचक्रोशीतलं मोठं नावाजलेलं… इथले देवीचं मंदिर तर प्राचीन वास्तूकलेचा आदर्श नमुना…असं सगळा फ्लॅश बॅक आठवता आठवता नव पुनर्वसीत किल्लारी गाव आता लंब रेषेत राष्ट्रीय महामार्गाला लागून वसलेलं निमशहरी गाव झालेलं दिसलं.. कर्तव्यावर गेलो कर्तव्यपार केल्यानंतर मला जुनं किल्लारीगाव खुणावत होतंच…

माझ्या सोबत ग्रंथालय सहायक संचालक सुनील हुसे, आमचे मित्र आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजभिरे , उदगीरचे पत्रकार मित्र रामभाऊ मोतीपवळे, माझे स्नेही ग्रंथालय विभागाचे अधिकारी सोपानराव मुंढे सगळेच म्हणे आम्हालाही बघायचं आहे… मला रस्त्यात आठवलं मी 2001 ला पुण्याच्या सिंबॉयसिस मास मीडिया संस्थेत नोकरीत असताना देशभरातल्या विद्यार्थ्यांची स्टडी टूर्स इथे आणलेली… त्यावेळी नवं गाव वसत होतं… किल्लारीच्या वेदनेचे ठसे मोठमोठ्या दगड मातीच्या ढीगाऱ्यात दिसत होते… सगळीकडे माती आणि दगड आणि निर्मनुष्य जागा होती… प्राचीन देवीच्या मंदिराचे काम करणारे पुरातत्व विभागाचे लोकं आणि कामगार वगळता तिथं कोणी नव्हतं… हे सगळं आठवण संपलं आणि जुन्या किल्लारी चौकातून डावीकडे वळलो आणि किल्लारी सुरु झालं…

दुतर्फा रानटी झाडं असल्यामुळे वेदनेचे वर्ण झापलेले दिसलें… गाडी थेट निळकंठेश्वर मंदिराकडे गेली… दर्शन झाले.. माझे लक्ष त्या देवीच्या मंदिराकडे होते, एकाला विचारून तिकडे गेलो… मंदिर पुरातत्व विभागाने बांधून पूर्ण केलेले दिसलें… लोकांनी त्यांच्या नेहमीच्या पद्दतीने हे हेमाडपंथी मंदिर शैली म्हणून शिक्का मारला… माझी इच्छा थेट गर्भ गृहात जायची होती पण लक्षात आले मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे… तिथे एक मस्त कपटावर पेननी लिहलेलं होतं… ” कोणाला चावी हवी असल्यास हाक मारावी.. मागच्या बाजुला घर आहे तिथे चावी आहे.. ते घेऊन येतील. ” बॉर्डाच्या बाबतीत उगीच पुण्याला नाव ठेवतो असं वाटून गेलं.. मंदिर बघून बाहेर आलो तर पांढरी टेकडी दिसली म्हटले… घर दिसतंय आत जाऊ… सगळे गेलो… तर तिथे मोठमोठ्या समाधी दिसल्या एक आड दिसला… इथं भूकंपापूर्वी सुबक बांधकाम होतं हे तिथं पडलेल्या घडीव दगडावरून कळत होतं… आतून हेलावून गेलो होतो… नांदती गावं निसर्गाच्या रौद्र रुपापुढं बेचीराख झालेली आपल्या डोळ्यांनी आपण पाहिली आहेत…मातीच्या ढिगाऱ्यावरून चाळताना धस झालं… त्या 31 सप्टेंबर पासून पाऊस पडत होता.. आणि मृत्यूचा आकडा खूप मोठा होता त्यामुळे कदाचित काही लोक कायमची आत गाढली गेली… त्या ढिगावरून आपण आज चालतो आहोत… पुढे स्मृती स्तंभ केला आहे तिथे गेलो… किल्लारी भूकंपात स्मृतीशेष सर्वांना अभिवादन केलं… आणि आमचं लक्ष मोठ्या पाण्याच्या टाकीकडं गेल…म्हटलं इथे माणसं नसताना ही टाकी का बांधली असेल… विचारणा केली त्यावेळी कळले… भूकंपात सगळं पडलं फक्त ही टाकी मात्र शंभर टक्के सुरक्षित राहिली… आम्ही तोंडात बोट घातलं.. हे बांधणाऱ्या अभियंत्याला दुवा दिल्या… आता किल्लारी गावाचा 27 हेक्टर परिसर वन खात्याच्या ताब्यात आहे.. स्मृती स्तंभाच्या ठिकाणी सुंदर हिरवळ… फुलांची झाडं केली आहेत.. तिथल्या गार्डला विचारलं ही पाण्याची टाकी पडणार नाहीत का तर तो म्हणे इथलं एकमेव जिवंत स्मारक तेवढे आहे त्याचे जतन करण्याचं ठरवलं आहे… 30 वर्षांपूर्वीची एक जाहिरात काढलेली त्यावर दिसली आणि किल्लारी गावावर येत्या काही वर्षात 27 हेक्टर मध्ये वनराई बहरलेली असेल… माणसं गेली त्याचे स्मरण म्हणून वन फुलवलं जात आहे हे अत्यंत दिलासादायक गोष्ट बघून किल्लारीचा निरोप घेतला….!!

@युवराज पाटील
(लेखक हे सध्या पुणे कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी आहेत )




