*अखंड हरिनाम सप्ताहातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार*
*किशोर शिवणीकर यांना अटक करा*
भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीतर्फे उपोषण सुरू
लातूर, (प्रतिनिधी) लातूर तालुक्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी कोट्यवधी रुपयाची देणगी गोळा करून हिशेब न देताच पलायन केलेल्या तथाकथित महाराज किशोर जाधव शिवणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी वारकरी संपद्राय कृती समितीतर्फे समस्त लातुरकरांच्या वतीने दोन दिवसाचे उपोषण गुरुवारी सुरू झाले.
आज विविध संस्था, संघटना व अनेक नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. दि. २९ मे २०२६ संध्याकाळ पर्यंत लातुरातील गांधी चौकात उपोषण सुरू राहील. प्रारंभी गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात झाली. उपोषण करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने कृती समितीचे निमंत्रक शाम बरूरे, हभप रामकृष्ण शिंदे महाराज, चंद्रकांत आरडले, संदीपान बडगिरे, डॉ. गणेश गोमारे, सुनिल कावळे, तुषार रेड्डी व इतर काही नागरिकांचा समावेश आहे.

दिवसभर उपोषणस्थळी अनेक नागरिक तसेच भाविकांनी भेट देऊन या आंदोलनात भाग घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दशरथ भिसे, नगरसेवक संजय गायकवाड, सुधीर भोसले, रणजित आचार्य यांनी पाठिंब्याचे पत्र कृतीसमितीला दिले. यावेळी हरिदास तम्मेवार, चंद्रकांत नरहरे, सुनिल कावळे, विनायक चव्हाण, महेश चामे, कपिल घावारे, शितल पोतदार, श्रीनिवास बोराडे, संग्राम मोरमपल्ले, आकाश कांबळे, नितीन पहिले, रविराज मुरकुले, कुलदीप महाराज सुर्यवंशी, गोविंद मुंडे, तुषार रेड्डी, श्रीराम मलवाडे, अमर गवळी, धनंजय आवस्कर, नंदकिशोर पाटील आदी़ंची प्रामुख्याने उपस्थिती होती. भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समितीचे निमंत्रक शाम बरूरे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दि २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत खंडापूर येथे वरील कार्यक्रम झाला. यासाठी सर्वसामान्य नागरिक, भाविक, संस्था, राजकीय व्यक्ती व अनेक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यासाठी सढळ हातांनी देणग्या दिल्या. तसेच लाखो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. परंतु तथाकथित महाराज किशोर जाधव शिवणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये देणगी स्वरूपात गोळा करून त्याचा अपहार केला व त्याचा हिशेब न देताच कोट्यवधी रुपये घेऊन सर्व जण फरार झाले आहेत. या टोळक्याने सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशाचा अपहार तर केला आहेच, शिवाय भक्त – भाविकांच्या भावनांशी खेळ करण्याचा धार्मिक भ्रष्टाचार पण केला आहे. मी स्वतः पंधरा दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीसांकडे याबाबत लेखी तक्रार दिली असून उपलब्ध पुरावे सादर केले आहेत. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, म्हणून हे उपोषण आम्ही करीत आहोत.

या कृती समितीमध्ये शंकर महाराज कदम, ज्ञानोबा बडगिरे, मुकुंद मेकले, निलेश महाराज किल्लारीकर, सुनील कावळे, संदिपान बडगिरे, दिलीप महाराज वलसे, चंद्रकांत आरडले, भुषण महाराज तळणीकर, शाम बरूरे, डॉ. गणेश गोमारे, अरुणभैय्या आकडे, कैलाश महाराज मद्दे, महेश चामे, रामकृष्ण महाराज गोविंदनगर, तुषार लखनगिरे, अरुण शिंदे, शाम जैन, नारायण मुंडे, रविराज मुटकुळे, विनायक चव्हाण, गुरुनाथ गौळी, काका बोके, बाबा महाराज बोराडे, दिलीप नलवाडे, माऊली सुडे, विष्णू महाराज कोळी, गणेश महाराज सोनवणे, पांडुरंग महाराज सुमठाणकर, विनायक महाराज घुगीसांगवी, बाळकृष्ण गुरुजी सुगाव, बळीभाऊ खळंग्रीकर, कुलदीप महाराज शिऊरकर, नितीन महाराज हिप्परगेकर यांच्यासह अनेक नागरिक व भाविकांचा समावेश आहे.
——————————–




