आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत तांबरवाडी येथे ‘जलसमृद्ध औसा’ अभियानाची ग्रामसभा
तांबरवाडी येथे ‘जलसमृद्ध औसा’ अभियानाची ग्रामसभा; जलसंपन्नतेकडे मोठे पाऊल
औसा- औसा मतदारसंघातील तांबरवाडी येथे दि. १ मे रोजी ‘जलसमृद्ध औसा’ अभियानांतर्गत ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेला आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. गावाच्या जलसंपन्न भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.

या अभियानांतर्गत तांबरवाडी परिसरातील नाल्यांचे सर्वंकष खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार असून दर १०० मीटर अंतरावर रिचार्ज शाफ्ट उभारले जाणार आहेत. तसेच पाण्याचे संवर्धन करण्यासाठी कम्पार्टमेंट बंडिंगची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी फत्तेपूर येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, त्या कामाला गती मिळाल्यानंतर आता तांबरवाडीतील कामांची सुरुवात करण्यात आली आहे.या उपाययोजनांमुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होऊन तांबरवाडी व परिसरातील गावे जलसमृद्ध होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात आले.हा उपक्रम ‘क्रिएटिव्ह फाउंडेशन’, ‘टाटा मोटर्स फाउंडेशन’, ‘नाम फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या भागाचा दौरा करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.याशिवाय सात गावांमध्ये ‘सिल्क-मिल्क’ संकल्पनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. अपेक्षित कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.दुष्काळग्रस्त अशी ओळख पुसून टाकण्यासाठी ‘जलसमृद्ध औसा’ अभियान प्रभावी ठरणार असून “आपल्या गावातील पाणी आपल्या गावातच” हा संकल्प साकारण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
या ग्रामसभेस उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. अंबादास जोशी, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष अप्पा मुक्ता, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती अमोल पाटील, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, टाटा मोटर्स फाउंडेशनचे प्रमोद घायाळ व रिना कांबळे, सरपंच राधाकृष्ण जाधव,उपसरपंच राम बिराजदार, तंटामुक्ती अध्यक्ष सुग्रीव लोंढे, सचिन आनसरवडे यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




